
नागपूर : विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक हे सरकारवर टीका करणाऱ्यांविरोधात वापरण्यासाठी नाही. मात्र, नक्षलवादींसारखे वागणाऱ्या ‘शहरी नक्षलीं’ना या कायद्यांतर्गत अटक करून शिक्षा केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिला.
राज्याच्या विधिमंडळात नुकतेच ‘जनसुरक्षा विधेयक’ मंजूर करण्यात आले. या विधेयकावरून राज्यात फडणवीस सरकारवर जोरदार टीका होत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, शहरातील नक्षलवाद आणि ‘सक्रिय नसलेला दहशतवाद’ यावर लक्ष केंद्रित करत डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी संघटनांच्या बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी ‘महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक, २०२४’ हे पावसाळी अधिवेशनात राज्य विधिमंडळात मंजूर करण्यात आले आहे.
या विधेयकात कठोर तरतुदी आहेत. दोषी आढळल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि मोठ्या रकमेचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे. मात्र, यामुळे विरोधक आणि नागरी संघटनांनी या कायद्याचा वापर मतभेद व विरोधकांना दडपण्यासाठी केला जाईल, असा आरोप करत त्यावर टीका केली आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “हा कायदा निदर्शक किंवा सरकारवर टीका करणाऱ्यांविरोधात नाही. पण जर तुम्ही ‘शहरी नक्षलवादीं’सारखे वागलात, तर तुम्हाला अटक केली जाईल.”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, आपल्या कार्यकर्त्यांना या नव्या कायद्यांतर्गत अटक करून दाखवा, असे खुले आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्यानंतर फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री कधी कधी गमतीने बोलतात! मुख्यमंत्र्यांची सारवासारव
मंत्री आपल्या भाषणात कधी कधी गमतीने बोलतात, प्रत्येक गोष्टीचा आपण बाऊ करू लागलो तर हे योग्य नाही, अशी सारवासारव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काही वक्तव्ये महत्त्वाची असतात तर काही चुकीची असतात, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. शिरसाट जे बोलले त्यात चुकीचे वाटत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. मेघना बोर्डीकर यांच्यासोबत बोलणे झाले आहे. त्यांचे बोलणे माध्यमांकडून अर्धवट दाखवण्यात येत असल्याचे फडणवीस म्हणाले.
आपल्या बापाचे काय जातेय? - संजय शिरसाट
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे अकोल्यातील सामाजिक न्यायभवनाचे उद्घाटनासाठी शहरात आले होते. सामाजिक न्यायभवनाच्या वसतिगृहासाठी तुम्ही ५, १० किंवा १५ कोटी अशी कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचे काय जातेय, असे वादग्रस्त वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे.
शिवसेनेचा बाप मीच - परिणय फुके
‘शिवसेनेचा बाप मीच’ असल्याचे वादग्रस्त विधान भाजप कार्यकर्ता मेळाव्यात भाजप आमदार परिणय फुके यांनी केल्याने यावरून शिवसेना शिंदे गट संतप्त झाला आहे. फुके यांनी १२ तासांच्या आत त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी अन्यथा आम्ही शिवसेनाशैलीत त्यांना योग्य उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना शिंदे गटाने दिला आहे. यामुळे महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचे दिसून आले आहे.