

कराड : पाटण तालुक्यातील मल्हारपेठ परिसरात बनावट नोटाचलनात चालवून लोकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेला उरुल (ता. पाटण) गावाचा सरपंच नितीन जलदेव निकम याने अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला असून सदर राजीनामा पत्र ग्रामपंचायतीने सातारा जिल्हाधिकारी, पाटण तहसीलदार व पाटण पंचायत समितीचे गटविकास अधिकार्यांच्याकडे पाठविले आहे.
उरुल ग्रामपंचायतीने याबाबत माहिती देताना सांगितले की, सरपंच नितीन जलदेव निकम याचा राजीनामा १ जुलै २०२६ पंचायत समितीकडे पाठवला. यानंतर उरुल ग्रामपंचायतीची विशेष मासिक सभा १४ जुलै रोजी पार पडून या सभेत सरपंचाने दिलेल्या राजीनाम्याचे वाचन करण्यात आले. उरुल ग्रामपंचायतीने सदर राजीनामा पत्र सातारा जिल्हाधिकारी यांना गेल्या १५ जुलै रोजी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सतीश श्रीरंग निकम व ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी विशाल मोहिते यांनी संयुक्त स्वाक्षरीने पाठविले आले.सदर राजीनामा पत्रासोबत मासिक सभा ठरावाची नक्कल प्रत,राजीनामा अर्जाची मूळ प्रत,पद रिक्त माहिती पत्र सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), पाटण तहसीलदार, पाटण पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.
तिघांवर गुन्हे दाखल
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी उरुल सरपंच नितीन निकम, राजेंद्र थोरात तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अन्य तिघांवर मल्हारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे सरपंचालाच अटक होण्याची नामुष्की आली होती.