त्र्यंबकराजाला धूप दाखवण्याची परंपरा पिढ्यांची ; पुढील वर्षांपासून परंपरा बंद करण्याचे उरुस आयोजकांनी केले जाहीर

त्र्यंबकेश्वरमध्ये बुधवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजाचे ग्रामस्थ होते
त्र्यंबकराजाला धूप दाखवण्याची परंपरा पिढ्यांची ; पुढील वर्षांपासून परंपरा बंद करण्याचे उरुस आयोजकांनी केले जाहीर

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मीयांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा कथीत वादाचा नवा पैलू समोर आला आहे. ‘‘आम्ही आमच्या आजोबांपासून त्र्यंबकराजाला धूप दाखवत आहोत. पण, ही प्रथा आता आम्ही बंद करतो आहोत,’’ असे उरुस आयोजक सलीम सय्यद यांनी म्हटले आहे. पुढच्या वर्षीपासून त्र्यंबकराजाला धूप दाखवणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये बुधवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजाचे ग्रामस्थ होते. त्र्यंबकेश्वर मंदिराचे गोमूत्र शिंपडून आणि फुले वाहून शुद्धीकरण करण्यात आले. याबाबत विचारले असता सलीम सय्यद म्हणाले की, त्र्यंबकेश्वर राजाला उरुस असताना धूप दाखवण्याची परंपरा ही आमच्या आजोबांपासून चालत आलेली आहे. आम्ही ही परंपरा जपली. पण, जे काही घडलं ते काही चांगलं घडलं नाही. आमची विनंती आहे, की चुकलं असेल तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागतो. यानंतर आम्ही धूप दाखवण्याची प्रथा बंद करु. जे काही वातावरण चिघळलं आहे, त्यामुळे आम्ही प्रथा बंद करतो आहोत, असं सलीम सय्यद यांनी म्हटलं आहे.

त्र्यंबकेश्वर येथे १३ मे रोजी दुसऱ्या धर्माच्या एका गटाकडून यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा मंदिर परिसरात थांबली. देवाला धूप दाखवू द्या, असा आग्रह त्या गटाने धरला. पुरोहितांनी त्याला विरोध दर्शविला. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदू धर्मीयांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याचा फलक आहे. पुरोहितांच्या विरोधाचे तेच कारण होते. या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

गावात आजवर कधीच वाद नाही

‘‘गावात आम्ही सगळे एकत्र वाढलो आहोत. कधीही वाद झाला नव्हता. मात्र, हा जो वाद झाला त्यामुळे आम्ही आता उरुसाच्या दरम्यान असलेली ही प्रथा बंद करतो. माझे वडीलही ही प्रथा पाळत होते. त्याआधीही आजोबाही प्रथा पाळायाचे. आता यापुढे म्हणजे पुढच्या वर्षीपासून आम्ही त्र्यंबकेश्वर राजाला धूप दाखवणार नाही.’’

logo
marathi.freepressjournal.in