नाशिक कुंभमेळ्यासाठी एआयचा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे संबंधित विभागाला निर्देश

२०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करा, तसेच कुंभ मेळाव्यासाठी स्वतंत्र कुंभ मेळा प्राधिकरण निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिले.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यात घडलेल्या घटनेचा धडा घेत २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करा, तसेच कुंभ मेळाव्यासाठी स्वतंत्र कुंभ मेळा प्राधिकरण निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिले.

२०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सादरीकरण केले. मागील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार नाशिकमधील एक पथक प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या तयारीची माहिती घेण्यास पाठविण्यात आले होते. या पथकाने नोंदविलेल्या सूचना व त्याअनुषंगाने सिंहस्थ कुंभमेळ्यात करावयाच्या सोयी सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन सुव्यवस्थित व्हावे, सर्व यंत्रणांचा समन्वय व्हावा, कुंभ मेळ्याची कामे गतीने व्हावीत, यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करावे, कुंभमेळा प्राधिकरण कायदा तयार करावा, कुंभमेळ्यासाठी लागणारे मनुष्यबळ कुंभमेळा प्राधिकरणाच्या अखत्यारित घ्यावे, अशा सूचना फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या.

रस्ते मार्गांचे बळकटीकरण करावे

सिंहस्थसाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे मुंबई, जव्हार, गुजरात, छत्रपती संभाजी नगर, शिर्डी, धुळे, पुणे, मुंबई अशा मार्गाने भाविक येण्याची शक्यता आहे. मार्गातील रस्त्यांचे बळकटीकरण करावे, रस्त्यांवर वाहनतळांची सुविधा निर्माण करावी, कुंभ काळात शहरात वाहने सोडण्यात येऊ नये, वाहनतळ ते शहरात ई बसचा पर्याय उपलब्ध करून द्यावा असे निर्देश त्यांनी दिले.

धार्मिक स्थळांचे कॉरिडॉर निर्माण करा

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेले भाविक जवळच्या त्र्यंबकेश्वर, शिर्डी, वणी, शनिशिंगणापूर, मांगीतुंगी अशा धार्मिक स्थळांनाही भेट देतात. त्या अनुषंगाने या धार्मिक स्थळांचे कॉरिडॉर तयार करावे, नाशिकमधील रामकाल पथाचे काम पुढील वर्षापर्यंत पूर्ण करावे तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घ्यावे, त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्तासह इतर कुंडांचे सौंदर्यीकरण करावे, मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

logo
marathi.freepressjournal.in