मंत्रालयातील सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

व्हीव्हीआयपी, व्हीआयपी, मंत्री, सनदी अधिकारी आदींची मंत्रालयात ये-जा सुरू असते. त्यातच कामानिमित्त राज्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक मंत्रालयात येत असतात.
मंत्रालयातील सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करा; मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
एक्स @Dev_Fadnavis
Published on

मुंबई : व्हीव्हीआयपी, व्हीआयपी, मंत्री, सनदी अधिकारी आदींची मंत्रालयात ये-जा सुरू असते. त्यातच कामानिमित्त राज्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक मंत्रालयात येत असतात. त्यामुळे मंत्रालयातील सुरक्षा अधिक भक्कम व्हावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा संभाळताच मंत्रालयातील सुरक्षेची झाडाझडती गुरुवारी घेतली.

कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानातून मंत्रालय प्रवेश ते बाहेर पडेपर्यंतची व्यवस्था कार्यरत करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मंत्रालयातून विधान भवनात कार्यालयीन कामकाजासाठी अधिकारी व कर्मचारी जात असतात. अधिवेशनादरम्यान विधान भवन ते मंत्रालय वर्दळ वाढलेली असते. विधान भवनात नियमित कार्यालयीन कामासाठी जात असलेले अधिकारी, कर्मचारी यांना सर्व ठिकाणी प्रवेश असलेले सुरक्षा पास देण्यात यावेत. मंत्रालय ते विधान भवन भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. विधान भवनात जाणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना या भुयारी मार्गामध्ये प्रवेश मार्ग उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

मंत्रालयात गुरुवारी आयोजित बैठकीत मंत्रालय सुरक्षा व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर सुरक्षा जाळी बसवावी

मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर सुरक्षा जाळीचे काम पूर्ण करावे. काम पूर्ण झाल्यास मध्ये लावलेले सुरक्षा जाळे काढून टाकावे. मंत्रालय प्रवेशद्वारावर सामानाची चोख तपासणी करण्यात यावी. कुठलीही आक्षेपार्ह वस्तू मंत्रालयात येणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in