
नाशिक : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील एकूण १७२ पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. सर्व प्रवासी सुखरूप असून त्यापैकी १७१ पर्यटकाशी संपर्क झाला असून ते सुरक्षित ठिकाणी आहेत. उर्वरीत १ पर्यटक श्रीमती. कृतिका जैन यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उत्तराखंडमध्ये दाखल झाले असून त्यांनी विविध ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपायोजनांची माहिती दिली.
याशिवाय परिसरातील रस्ते देखील पुर्वरत सुरू करून त्याद्वारे नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास राज्यमंत्री अजय तमता यांची देखील मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन याबाबत त्यांच्याशी संवाद साधला आहे. राज्य शासनाकडून सर्व महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
पर्यटकांना एअर लिफ्ट करणार..
महाराष्ट्रातील एकूण १७१ पर्यटकांपैकी सर्व जण पर्यटक सुखरुप आहेत. सुरक्षित पर्यटकांनी त्याच्या नियोजित कार्यक्रमानुसार पुढील वाटचाल सुरु केली आहे. उर्वरित ८३ पर्यटक गंगोत्री येथे सुरक्षित असून त्यांना एअर लिफ्ट करुन मताली येथे हलविण्यात येणार आहे. राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र हे उत्तराखंड आपत्ती नियंत्रण कक्ष तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष उत्तरकाशी आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र नवी दिल्ली यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
उत्तराखंड सरकारकडून उपाययोजना..
दरम्यान, महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे स्वतः उत्तराखंड येथे घटनास्थळी दाखल झाले आहेत. शोध व बचावकार्यासाठी ते दिशानिर्देश देत असून पर्यटकांना सुखरूप स्थळी पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने त्यासंबंधी उपाय योजना उत्तराखंड राज्य शासनाकडून राबवल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली.