वैभववाडी - कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात; रेल्वे मंत्र्यांचे राणेंना आश्वासन

सिंधुदुर्ग जिल्हा हा कोल्हापूरला, पर्यायाने पश्चिम महाराष्ट्राला जोडला गेल्याने मालाची ने-आण करण्यासाठी त्याचा उपयोग होईलच शिवाय पर्यटन वाढीसाठी त्याचा उपयोग होईल, असे राणे यांनी सांगितले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

राजन चव्हाण/ कुडाळ

कोकण रेल्वेला जोडणाऱ्या वैभववाडी - कोल्हापूर या नियोजित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून आवश्यक ती आर्थिक तरतूद करून या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेमंत्री वैष्णव यांनी आपल्याला दिले असल्याची माहिती भाजपचे खासदार नारायण राणे यांनी बुधवारी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा हा कोल्हापूरला, पर्यायाने पश्चिम महाराष्ट्राला जोडला गेल्याने मालाची ने-आण करण्यासाठी त्याचा उपयोग होईलच शिवाय पर्यटन वाढीसाठी त्याचा उपयोग होईल, असे राणे यांनी सांगितले. कुडाळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा राणे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. कोकणातील १२ रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून गेल्या महिन्यात कणकवली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग स्थानकांचा लोकार्पण सोहळा पार पडला. तर बुधवारी कुडाळ रेल्वे स्थानकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात पार पडला.

कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. रेल्वे प्रवाशांच्या सुद्धा समस्या आहेत, हे प्रश्न कोकण रेल्वेने तसेच खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोडवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या भाषणात केले. माझ्या पक्षाने मला दिलेली संधी बांधकाम विभागाच्या माध्यमातून मला पूर्ण करता आली, याचे मला समाधान आहे. जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी, जिल्ह्यात दळणवळणाची साधने वाढविण्यासाठी आपण कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी आणल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले.

पर्यटन जिल्हा घोषित झाला त्याचे सर्व श्रेय खासदार नारायण राणे यांना द्यावे लागेल. पर्यटन वाढीसाठी रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करणे गरजेचे वाटले आणि म्हणूनच आपण हे पाऊल उचलले असे त्यांनी स्पष्ट केले. मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर असलेला ऐतिहासिक 'मोरयाचा धोंडा' व आसपासचा परिसर पर्यटन दृष्ट्या विकसित करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न आहेत असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला कोकण रेल्वेचे संचालक (वित्त) राजेश भडंक, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, राजू राऊळ, दीपलक्ष्मी पडते, संध्या तेरसे, रेल्वेचे अधिकारी, भाजपचे कार्यकर्ते आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन स्थानकांचे लोकार्पण

रत्नागिरीतील -५ रायगडमधील- ३ रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर असून वीर आणि कोलाड या दोन रेल्वे स्थानकांचा लोकार्पण सोहळा लवकरच होणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे आमंत्रण पत्रकार आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना या आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांना दिले नसल्यामुळे अनेक नेते अनुपस्थित राहिले. बांधकाम विभागाच्या या गलथान कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

स्थानकांचे सुशोभीकरण हे जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी उपयुक्त असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे त्याबद्दल अभिनंदन. एखादे चांगले काम केले की त्यात दोष दाखवायचे आणि काम केले नाही तर टीका करायची ही वृत्ती आता सोडून द्यायला हवी, असा विरोधकांना टोला लगावत गेल्या इतक्या वर्षांमध्ये जिल्हा समृद्ध का झाला नाही ? याचे त्यांनी आणि सर्वसामान्य लोकांनी आत्मपरीक्षण करायला हवे. - खा. नारायण राणे, भाजप

logo
marathi.freepressjournal.in