कार्तिकीला आज पंढरपुरात वैष्णवांचा मेळा; शासकीय पूजेचा मान विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना

कार्तिक शुद्ध प्रबोधनी एकादशीदिनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वैष्णवांचा मेळा भरणार आहे. या यात्रेसाठी २ लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पंढरपूर : कार्तिक शुद्ध प्रबोधनी एकादशीदिनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वैष्णवांचा मेळा भरणार आहे. या यात्रेसाठी २ लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.

यंदा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मंगळवारी पहाटे २.२० वाजता श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेचा मान सरकारचे प्रतिनिधी म्हणून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.), विभागीय आयुक्त, पुणे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

दरवर्षी कार्तिक यात्रेतील शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. मात्र, यंदा आचारसंहिता असल्याने उपमुख्यमंत्र्यांऐवजी महापूजेचा मान विभागीय आयुक्तांना मिळाला असल्याचे मंदिर समितीने सांगितले. आषाढी यात्रेच्या अनुषंगाने पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढत आहे. पालख्यांचे आगमन होत आहे. वारकरी मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. पंढरपूर शहरात गर्दी वाढत असून विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.

शासकीय महापूजेपूर्वी मंदिर समितीमार्फत होणारी श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेची पाद्यपूजा व नित्यपूजा अनुक्रमे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते संपन्न होत असून, शासकीय महापूजेसाठी प्रशासकीय अधिकारी व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित राहणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

कडक सुरक्षा व्यवस्था

या वारीत पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. सुरक्षा व वाहतूक नियंत्रणासाठी १,६२६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून जड वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या मदतीसाठी सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट तसेच अंबाबाई पटांगण येथे तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in