
पुणे : पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार असलेला संशयित आरोपी निलेश चव्हाण याला जेरबंद करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे. त्याला नेपाळ सीमेवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो गेले १० दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता.
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिची नणंद करिश्मा हगवणे हिने वैष्णवीचे नऊ महिन्यांचे बाळ निलेश चव्हाणच्या ताब्यात दिले होते. निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबाच्या जवळचा व्यक्ती असून, तो शशांक हगवणेची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र म्हणून ओळखला जातो.
वैष्णवीचे कुटुंबीय तिचे बाळ परत घेण्यासाठी २१ मे रोजी कर्वेनगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले होते. त्यावेळी निलेशने त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावले आणि घराबाहेर हाकलून लावले. त्याने बाळाचा ताबा देण्यासही स्पष्ट नकार दिला होता. या घटनेनंतर, वैष्णवीच्या माहेरच्यांनी (कस्पटे कुटुंबीयांनी) पोलिसांत धाव घेतली. निलेश चव्हाणवर बाळाची हेळसांड केल्याचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याच्या आणि पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरून पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बावधन पोलिसांनी त्याला वैष्णवीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल सहआरोपी केले आहे.
अटकेची कुणकुण लागताच निलेश चव्हाण २१ मेपासून अटक होण्याआधीच फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पुणे, मुंबई, कोकण, कर्नाटक आणि गोवा भागांसह विविध ठिकाणी तपास सुरू केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी ‘लूकआऊट नोटीस’ जारी केली होती.
गेल्या १० दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथके विविध राज्यांत आणि देशातील इतर राज्यांमध्ये शोध घेत होती. विशेष म्हणजे, या कालावधीत तो मोबाईल किंवा अन्य कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरत नव्हता. तसेच, पेटीएम, एटीएम, गुगलपे यांचाही वापर त्याने कटाक्षाने टाळला. त्यामुळे त्याचा माग काढणे पोलिसांना अवघड जात होते. निलेश चव्हाण याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याचे म्हटले जाते. त्याचा बांधकाम व्यवसाय असून तो पोकलेन मशीनच्या व्यवसायातही सक्रिय आहे. यापूर्वी १४ जून २०२२ रोजी त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
नेपाळमधील लॉजमध्ये मुसक्या आवळल्या
अखेर, पिंपरी-चिंचवड पोलिसांना खात्रीलायक खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे निलेशला नेपाळ सीमेवरून ताब्यात घेण्यात यश आले. तो महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा राज्यांतून प्रवास करत नेपाळमध्ये एका लॉजमध्ये मुक्कामी होता. त्याला आता पुण्याला आणले जात आहे.