‘व्हॅलेन्टाईन-डे’दिनी ‘आजी-आजोबा दिवस’; २२ वर्षांपासून जळगावच्या उज्ज्वल स्प्राऊटर स्कूलचा अनोखा उपक्रम

१४ फेब्रुवारी हा दिवस जगभर व्हॅलेन्टाईन-डे (प्रेम दिवस) म्हणून साजरा केला जातो. मात्र व्हॅलेन्टाईन-डे ही भारतीयांची संस्कृती नाही हे लक्षात घेऊन येथील उज्ज्वल स्प्राऊटर इंटर नॅशनल स्कूल ही शाळा गेल्या २२ वर्षांपासून हा दिवस आजी- आजोबा दिवस म्हणून साजरा करत आहेत.
‘व्हॅलेन्टाईन-डे’दिनी ‘आजी-आजोबा दिवस’; २२ वर्षांपासून जळगावच्या उज्ज्वल स्प्राऊटर स्कूलचा अनोखा उपक्रम
Published on

विजय पाठक/ जळगाव

१४ फेब्रुवारी हा दिवस जगभर व्हॅलेन्टाईन-डे (प्रेम दिवस) म्हणून साजरा केला जातो. मात्र व्हॅलेन्टाईन-डे ही भारतीयांची संस्कृती नाही हे लक्षात घेऊन येथील उज्ज्वल स्प्राऊटर इंटर नॅशनल स्कूल ही शाळा गेल्या २२ वर्षांपासून हा दिवस आजी- आजोबा दिवस म्हणून साजरा करत आहेत. यंदा देखील ३०० आजी-आजोबांच्या उपस्थितीत हा दिवस साजरा करण्यात झाला. यंदा आजी-आजोबांनी फॅशन शो रॅम्प वॉकमध्ये सहभाग घेत एक वेगळा आनंद लुटला.

विभक्त कुटुंबात दिसत नसलेले आजी-आजोबा हे नातवांना हवे असतात. त्यांचे प्रेम, घरातील महत्त्व लक्षात आणून देऊन त्यांना परत घरात मानाचे स्थान मिळावे, हा हेतू समोर ठेवत गेल्या २२ वर्षांपासून हा दिवस ‘आजी-आजोबा’ दिवस म्हणून विविध पद्धतीने तसेच विविध ठिकाणी ही शाळा साजरा करत आहे. यंदा हा आजी-आजोबा दिवस शाळेतच मोठ्या जल्लोषाने साजरा करण्यात आला. ३०० हून अधिक आजी-आजोबा याप्रसंगी उपस्थित होते. काही जण शाळेत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून आल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी गगडाणी यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांकरिता बहारदार नृत्य, गीते तसेच कविता सादर केल्या. आजी-आजोबांकरिता विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आजी-आजोबांसाठी फॅशन, शो आणि रॅम्प वॉकचे आयोजन केले होते. आजी-आजोबांना आपल्या शाळेच्या दिवसाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी बोरं, आवळे, चिंचा तसेच लिमलेटच्या गोळ्या देण्यात आल्या. याप्रसंगी काही आजी-आजोबांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ही शाळा राबवत असलेल्या या अनोख्या उपक्रमाबद्दल कौतुक केले आणि काही काळ आपल्या स्वत:च्या शालेय दिवसांची आठवण ताजी केल्याबद्दल शाळेचे आभार मानले. याप्रसंगी अनेक आजोबांना आपले अनुभव सांगताना गहिवरून आले.

कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शिक्षिका पुजा गुप्ता, आणि उज्जवला पाटील यांनी केले. समन्वयक सौ. सुनयना चोरडिया यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाकरिता अध्यक्षा सौ. अनघा गगडाणी, विश्वस्त प्रवीण गगडाणी यांची विशेष उपस्थिती होती. या भावपूर्ण कार्यक्रमास मुख्याध्यापिका मानसी गगडाणी यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमानंतर बोलतांना मानसी गगडाणी यांनी सांगितले की, या उपक्रमाचा मुलांवर चांगला परिणाम होत आहे. शाळा सोडून गेलेल्या मुलांनी आता बाहेरगावी देखील असा उपक्रम सुरू केला आहे. आजी आजोबांचे स्थान घरात आहे, व्रुध्दाश्रमात नाही हे आम्ही विदयार्थ्यांच्या मनावर बिंबवत आहोत, त्यास प्रतिसाद मिळत आहे हेच आमच्या या उपक्रमाचे यश आहे.

विद्यार्थ्यांनी घेतली भावपूर्ण प्रतिज्ञा

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचा हातात हात घेऊन ते सदैव आपल्या आजी-आजोबांवर प्रेम करतील, नेहमी त्यांचा आदर करतील, त्यांची काळजी घेतील आणि भविष्यात त्यांच्या आजी-आजोबांना वृद्धाश्रमात जायची वेळ येणार नाही, अशी भावपूर्ण प्रतिज्ञा घेतली. यावेळी अनेक आजी-आजोबांना आपले अश्रू आवरता आले नाही. शेवटी सर्व आजी-आजोबांनी आपल्या नातवंडांसोबत डब्बा पार्टीचा आनंद घेतला. विविध खेळांमधील विजेत्या आजी-आजोबांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in