‘मविआ’शी काडीमोड, तर जरांगेंशी ‘घरोबा’? वंचितचे ८ उमेदवार जाहीर नागपुरात काँग्रेसला पाठिंबा देणार

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी केल्याचे जाहीर केले आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानुसार उमेदवारांची यादी जाहीर करीत असल्याचे सांगून वंचितच्या उमेदवारांची नावे घोषित केली.
‘मविआ’शी काडीमोड, तर जरांगेंशी ‘घरोबा’? वंचितचे ८ उमेदवार जाहीर नागपुरात काँग्रेसला पाठिंबा देणार

विशेष प्रतिनिधी/मुंबई

वंचित बहुजन आघाडीने ‘मविआ’शी वाटाघाटीच्या फेऱ्या फिसकटल्यानंतर त्यांच्याशी काडीमोड घेऊन मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी ‘घरोबा’ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन वंचितच्या ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे वंचितला सोबत घेऊ पाहणाऱ्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, वंचितने नागपूरमध्ये कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णयही जाहीर केला आहे.

अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. आंबेडकर यांनी ही घोषणा केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी केल्याचे जाहीर केले आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानुसार उमेदवारांची यादी जाहीर करीत असल्याचे सांगून वंचितच्या उमेदवारांची नावे घोषित केली. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्याचा दाखला देत त्यांनी नव्या आघाडीचे सुतोवाच केले. परंतु, खुद्द जरांगे पाटील यांनी या आघाडीचा इन्कार केला. मराठा बांधवांना आपण ३० मार्चची तारीख दिली आहे. त्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असे जरांगे पाटील म्हणाले.

काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात काही निर्णय झाले. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसींसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. मुस्लीम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचे समर्थन असेल, असे आंबेडकर म्हणाले.

वंचितची पहिली उमेदवार यादी

  • भंडारा-गोंदिया : संजय गजानन केवट (दिवर समाज)

  • गडचिरोली-चिमूर : हितेश पांडुरंग मडावी (गौंड समाज)

  • चंद्रपूर : राजेश वारलुजी बेले (तेली समाज)

  • बुलडाणा : वसंत राजाराम मगर (माळी समाज)

  • अकोला : प्रकाश आंबेडकर

  • अमरावती : प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान (राखीव)

  • वर्धा : प्राध्यापक राजेंद्र साळुंखे (कुणबी)

  • यवतमाळ-वाशिम : खेमसिंग प्रतापराव पवार (बंजारा)

नागपूरमध्ये काँग्रेसला समर्थन देण्यात येणार असून सांगलीत ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना झाली असून प्रकाश शेंडगे लढत असतील तर त्यांना पाठिंबा देण्यात येईल, असे वंचितने जाहीर केले.

जरांगेंचा ३० तारखेला निर्णय

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगेंना ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रस्ताव दिला आहे. आंबेडकरांच्या या प्रस्तावावर मनोज जरांगे हे सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. आंबेडकरांचा प्रस्ताव हा चांगला असल्याचे सांगत येत्या ३० मार्चनंतर आपण निर्णय घेणार असल्याचे जरांगे म्हणाले. त्यामुळे आंबेडकर तिसरा पर्याय देण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. वंचिच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार आहे.

वंचितने मतविभाजन टाळावे - पृथ्वीराज चव्हाण

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीतील मतविभाजन टाळावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. २०१९ घ्या लोकसभा निवडणुकीत व़ंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे मत विभाजन होऊन त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात भाजपला झाला होता, याची आठवणही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी करुन दिली.

समाजाला विचारल्याशिवाय काहीही करणार नाही - जरांगे-पाटील

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देण्याचा निर्णय समाजाने घेतला आहे. प्रकाश आंबेडकर काहीही म्हणत असले तरी माझ्या समाजाला काय वाटते, हे महत्त्वाचे आहे. समाजाला विचारल्याशिवाय मी काहीही करणार नाही,असे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

आंबेडकर -जरांगेंची तत्त्वे जमणार कशी - प्रकाश शेंडगे

मनोज जरांगे-पाटील व मराठा समाजाला सोबत घेऊन लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडी उतरविण्याचा मनोदय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. त्यावर ओबीसी व धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी आंबेडकर-जरांगे या़ंची तत्त्वे कशी जमणार, असा सवाल केला. ओबीसी समाजाला हे मान्य नाही, असेही शेंडगे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in