काँग्रेसचा वंचितला दणका

अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे वर्चस्व आहे. परंतु एकट्याच्या बळावर लोकसभेत जिंकून येईल एवढी ताकद त्यांच्याकडे नक्कीच नाही. त्यांना विजय प्राप्त करण्यासाठी कोणाची ना कोणाची ‘ताकद’ लागते. यावेळी तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे महाराष्ट्रातील चित्र आहे.
काँग्रेसचा वंचितला दणका

प्रतिनिधी/मुंबई

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक टप्प्यात आलेली असताना, ऐनवेळी महाविकास आघाडीला कोंडीत पकडले आणि रोज नवे प्रस्ताव देत चर्चा घडवून आणली. कधी २७ जागांची मागणी तर कधी बरोबरीने जागांचा आग्रह धरतानाच ६ जागांचा आग्रह धरला आणि महाविकास आघाडीने ५ जागांची तयारी दर्शविली असताना हा प्रस्ताव फेटाळून लावत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली. त्यातच त्यांनी काँग्रेसच्या ७ उमेदवारांना पाठिंबा देण्याचे जाहीर करून अकोल्याचा आपला मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठिंबा द्यायचा असेल, तर सर्वच जागांवर द्यावा, अशी ठोस भूमिका घेत अकोल्यातून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर करून मोठा दणका दिला. त्यामुळे आंबेडकर यांची खेळी फसल्याची चर्चा आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे वर्चस्व आहे. परंतु एकट्याच्या बळावर लोकसभेत जिंकून येईल एवढी ताकद त्यांच्याकडे नक्कीच नाही. त्यांना विजय प्राप्त करण्यासाठी कोणाची ना कोणाची ‘ताकद’ लागते. यावेळी तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे महाराष्ट्रातील चित्र आहे. महायुतीने अनेक पक्षांना सोबत घेऊन आणि विरोधी पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन मजबूत शक्ती उभी केली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत यावे, यासाठी आघाडीच्या नेत्यांनी खूप प्रयत्न केले. १ जागेवरून थेट ५ जागा देण्याची तयारी दर्शविली. परंतु ॲड. आंबेडकर यांनी रोज नवी भूमिका मांडत महाविकास आघाडीचा गोंधळ वाढविल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतही काही जागांवरून मतभेद होतेच. परंतु वंचितला ५ जागा देण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. मात्र, महाविकास आघाडीचा प्रस्ताव अमान्य करीत ॲड. आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांवर नाराजी व्यक्त करतानाच, आपण स्वतंत्र लढू पण काँग्रेसच्या ७ उमेदवारांना पाठिंबा देऊ, असे मध्यंतरी जाहीर केले. मात्र, या ७ उमेदवारांची यादी त्यांनी मला द्यावी, असे म्हटले. या भूमिकेचे काँग्रेसच्या काही नेत्यांनी स्वागतही केले. या पाठीमागे अकोल्यातून काँग्रेसचा उमेदवार देऊ नये, अशी यामागची भूमिका असेल, असे बोलले जात आहे. कारण २०१९ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारामुळेच ॲड. आंबेडकर पराभूत झाले होते. त्यामुळे ते महाविकास आघाडीसोबत राहिले असते तर कदाचित त्यांची जागा पक्की झाली असती. परंतु त्यांनी आघाडी केलीच नाही. त्यामुळे काँग्रेसने तेथून आता डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. आतादेखील येथे तिरंगी लढत होणे अटळ आहे. त्यामुळे या लढतीचा फायदा भाजपला होऊ शकतो. त्यामुळे आंबेडकर यांच्या वेळोवेळी बदलणाऱ्या भूमिकेमुळे अनेक जागांवर हीच परिस्थिती उद्भवण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीत नाराजी वाढली आहे.

वंचितसोबतच्या आघाडीच्या शक्यता मावळल्या

एकीकडे अकोल्यात काँग्रेसच्या उमेदवारीवरून पक्षातच एकवाक्यता नसल्याचे चित्र होते. परंतु प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ॲड. आंबेडकरांना खरेच महाविकास आघाडीसोबत यावे वाटत असेल, तर त्यांनी सर्वच उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे सांगतानाच काँग्रेसचा उमेदवार अकोल्यात देणार, अशी भूमिका घेतली आणि पक्षश्रेष्ठींनीही डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आता अकोल्यात तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे वंचितसोबतच्या आघाडीच्या शक्यता आता मावळल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in