

सुजित ताजणे / छत्रपती संभाजीनगर :
आरएसएसवर बंदी आणा आणि कार्यकर्त्यांवर केलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरएसएस कार्यालयावर जन आक्रोश मोर्चाची घोषणा केली होती. त्यानुसार शुक्रवारी क्रांती चौकात आरएसएस विरोधात वंचीत बहुजन आघाडीने मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी संघाच्या विरोधात घोषणा देत क्रांती चौक दणाणून सोडला. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही संघाच्या भाग्यनगर येथील कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्धार युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला होता. त्यामुळे सकाळपासूनच क्रांती चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
दुपारी बारा वाजताच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. क्रांती चौक ते आरएसएस कार्यालय असा जन आक्रोश मोर्चाचे स्वरूप होते.
परवानगी नाकारली असूनही मोर्चा निघाला
संघावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी या मोर्चात फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असूनही मोर्चा निघाला. अदालत रोड मार्गे संघाच्या कार्यालयावर पोहचताच पोलिसांनी बॅरिकेट लावून मोर्चा अडवला.