
नांदेड : मुंबई –जालना वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्ताराचा मुहूर्त ठरला असून २६ ऑगस्टपासून ती नांदेडवरून धावणार आहे. हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे अंतर ९ तास २५ मिनिटांत पूर्ण करेल. ज्यात एक्झिक्युटिव्ह क्लास आणि चेअर कार मिळून एकूण २० डब्बे असतील. जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये ८ डब्बे होते. त्यात वाढ करून २० डब्बे करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्याचा कोटा घटणार नाही, असे रेल्वेच्या जाणकारांकडून सांगण्यात येत.
भारतीय रेल्वेचा अभिमान आणि भारताची स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन-वंदे भारत एक्स्प्रेसने- महाराष्ट्रातील मराठवाड्यातून आपला पहिला प्रवास दि. ३० डिसेंबर २०२३ पासून सुरू केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर २०२३ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जालना ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले होते. या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जालना वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार हजूर साहिब नांदेड पर्यंत करण्यात आला आहे. या विस्तारित गाडीचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. एक विशेष गाडी २६ ऑगस्टला चालविण्यात येईल. या उद्घाटन विशेष गाडीचे वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येईल. या विस्तारित गाडीची नियमित सेवा २७ ऑगस्टपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजूर साहिब नांदेड आणि २८ ऑगस्टपासून हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अशी सुरु होईल.
९ तास २५ मिनिटांत पोहचणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हजूर साहिब नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस (२०७०६) हि गाडी दि. २७ ऑगस्टपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून गुरुवार वगळता रोज दुपारी १.१० वाजता सुटेल आणि दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना आणि परभणी रेल्वे स्थानकांवर थांबून हजूर साहिब नांदेड येथे रात्री १०.५० वाजता पोहोचेल. तर, हजूर साहिब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेस (२०७०५) हि गाडी २८ ऑगस्टपासून हजूर साहिब नांदेड स्थानकावरून बुधवार वगळता रोज सकाळी ५ वाजता सुटेल आणि परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर रेल्वे स्थानकांवर थांबून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी २.२५ वाजता पोहोचेल.