कोल्हापूर : बहुचर्चित आणि प्रतीक्षेत असलेली वंदे भारत सुपरफास्ट आणि आरामदायी रेल्वेला आजपासून कोल्हापुरातून प्रारंभ होणार आहे. या नव्या रेल्वेमुळे कोल्हापूरमध्ये विमानतळाबरोबरच सुपरफास्ट रेल्वे शुभारंभाचा मानाचा तुरा रोवला जाणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
१६ सप्टेंबरपासून कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर, नवी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होत आहे. आठवड्यातील तीन दिवस कोल्हापूर ते पुणे आणि अन्य तीन दिवस पुणे ते कोल्हापूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी कोल्हापुरातून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस, दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकात पोहोचणार आहे. तर प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी पुण्याहून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस, सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी कोल्हापुरात येईल. या पत्रकार परिषदेला विजय जाधव, सत्यजित कदम, राहुल चिकोडे, शिवनाथ बियानी उपस्थित होते.
एका फेरीत ५३० प्रवाशांना करता येणार प्रवास
कोल्हापूरहून गाडी सुटल्यानंतर मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या स्थानकांवर वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा आहे. या वंदे भारत एक्स्प्रेसला एकूण आठ डबे असतील. त्यामध्ये सात चेअरकार आणि एक एक्झिक्युटिव्ह क्लास असेल. पाच डब्यांमध्ये प्रत्येकी ७८, तर इंजिन जवळच्या दोन्ही बाजूंच्या डब्यात प्रत्येकी ४४ आणि एक्झिक्युटिव्ह क्लास मध्ये ५२ आसन क्षमता आहे. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसच्या एका फेरीतून ५३० प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
खा. धनंजय महाडिक यांचे जनतेला आवाहन
सोमवारी सायंकाळी चार वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानकावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना, कोल्हापूर रेल्वे स्थानकावर उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन स्वरूपात देशातील विविध मार्गावर धावणाऱ्या नव्या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर कोल्हापूर ते पुणे या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ होईल. सोमवारी सायंकाळी होणाऱ्या या कार्यक्रमाला करवीरवासीयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.