

नागपूर : वंदे मातरम ही फक्त एक गीत नाही; ते भारताच्या स्वातंत्र्याचा आणि राष्ट्रवादाचा मंत्र आहे. १५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर संसदेत चर्चा होणे महत्त्वाचे आहे आणि मला आनंद आहे की ही चर्चा सुरू झाली आहे. सभापतींनी जाहीर केले आहे की पुढील अधिवेशनात यावर चर्चा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, त्यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने या राष्ट्रीय गीताचे नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, वंदे मातरम कधीही बंदी घातली गेली नव्हती. गीताचे काहीही नुकसान झाले असेल तर त्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे.
काँग्रेसनेच ठराव करून वंदे मातरमचे दोन तुकडे केले आणि त्यातील केवळ अर्धा भाग गायला जाईल, असे ठरवले. दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली तर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपवर टीका केली. दरम्यान, संसदेत या गीतावर चर्चा सुरू आहे आणि ती झालीच पाहिजे. मात्र, विधिमंडळाच्या सभापती, अध्यक्षांनी यावर पुढील अधिवेशनात चर्चा केली जाईल, असे स्पष्ट केले असल्याने यावर पुढील अधिवेशनात चर्चा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.