राज्यात कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचेच व्हेरिएंट ; राज्यात कोरोनाचे ४०२४ नवे रुग्ण

मुंबईत २२९३ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून मुंबईत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
File Photo
File Photo

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी ती मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या मर्यादित क्षेत्रात होत आहे. मुंबईचा पॉझिटिव्हीटी दर हा आजच्या दिवसाला ४० टक्क्यांवर गेल्यामुळे या रुग्णवाढीकडे आरोग्य विभाग लक्ष देऊन आहे. राज्यात रुग्णवाढ जरी होत असली तरी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याची टक्केवारी ही कमी म्हणजे दोन ते तीन टक्के इतकीच असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली.

कोरोना रुग्णवाढ ठराविक जिल्ह्यापर्यंत मर्यादित आहे. वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉन या विषाणूचे व्हेरिएंट आढळून येत आहेत. या रुग्णांमध्ये अद्याप कोणताही नवीन ‘व्हायरस’ आढळून आलेला नाही, असेही राजेश टोपे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस भवनात जनता दरबार उपक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. या रुग्णवाढीमुळे आरोग्य विभाग पुन्हा सतर्क झाला असून ‘हर घर दस्तक’ या सूचनेप्रमाणे आशा वर्कर आणि आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन लसीकरणाची माहिती घेऊन लसीकरणाचे प्रमाण वाढवत आहोत, असेही टोपे म्हणाले.

विद्यार्थ्यांचे लसीकरण

राज्यात शाळा सुरू झाल्यामुळे १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण झाले नसल्यास ते पूर्ण करून घेण्याच्या सूचना पालकांना तसेच शिक्षकांना करण्यात येत आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहनही टोपे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. याशिवाय खबरदारी म्हणून राज्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाचे ४०२४ नवे रुग्ण, मुंबईत सर्वाधिक वाढ

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ४०२४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ३०२८ जण कोरोनातून बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या १९,२६१ सक्रिय रुग्ण आहेत. तर, पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजच्या माहितीनुसार, बीए ५ व्हेरियंटचे ४ रुग्ण आढळले आहेत. राजधानी मुंबईत २२९३ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून मुंबईत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in