पुण्यातील १५०० उमेदवारांवर विविध गुन्हे; ६० जणांवर गंभीर गुन्हे

किती गुन्‍हे दाखल आहेत याची माहिती मिळविण्यासाठी २६५० जणांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी तब्बल १५०० अर्जदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.
पुण्यातील १५०० उमेदवारांवर विविध गुन्हे; ६० जणांवर गंभीर गुन्हे
Published on

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष शाखेकडे निवडणूक लढविण्यासाठी आपल्‍यावर किती गुन्‍हे दाखल आहेत याची माहिती मिळविण्यासाठी २६५० जणांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी तब्बल १५०० अर्जदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या १५०० जणांपैकी सुमारे ६० उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

गंभीर गुन्हे दाखल असलेले उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी असोत वा निवडणुकीतून माघार घेतलेली असो, अशा सर्वांवर पोलिसांकडून बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी ही विशेष खबरदारी घेतली आहे.

दरम्‍यान कुख्यात गुंड गजा मारणे हा पत्नीच्या विजयासाठी सक्रिय झाला असून, शहरात प्रवेशास मनाई असल्याने शहरालगतच्या गावातून कोथरूडमधील मतदारांना फोनाफोनी करून प्रचार करत असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या तक्रारी पुणे पोलिसांकडे आल्या असून, गुंड मारणे आता पोलिसांच्या रडारवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयाला तिकीट देण्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आधीच टीका सुरू आहे.

मतदारांवर दबाव येतोत का यावरही लक्ष

कोथरूड परिसरातील अनेक मतदारांना गजा मारणे याचे फोन येत असून, पत्नीला मदत करण्याचे आवाहन केले जात आहे. या फोनाफोनीमुळे मतदारांवर दबाव येत असल्याच्‍या तक्रारीही पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक आचारसंहिता आणि कायदा-सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, कॉल्सची माहिती, संपर्क आणि हालचालींची तपासणी सुरू केली आहे. आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गुन्हेगारांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीवर प्रभाव पडणार नाही याची पोलीस दक्षता घेत आहेत. गजानन मारणे काही जणांना निवडणुकीच्या अनुषंगाने संपर्क करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यानुसार पोलीस त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.

अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर

logo
marathi.freepressjournal.in