जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य : वसंत देशमुख यांना पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात

काँग्रेसच्या युवा नेत्या जयश्री थोरात यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणारे भाजपचे नेते वसंत देशमुख यांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले. गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य : वसंत देशमुख यांना पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात
Published on

अहिल्यानगर : काँग्रेसच्या युवा नेत्या जयश्री थोरात यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणारे भाजपचे नेते वसंत देशमुख यांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले. गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

जयश्री यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ते गायब होते. स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना लवकरच जिल्ह्यात आणून न्यायालयात हजर केले जाईल.

शुक्रवारी रात्री धांदरफळ येथे सुजय विखे यांच्यावतीने आयोजित मेळाव्यात बोलताना वसंत देशमुख यांनी भाषणादरम्यान बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सभास्थळी ठिय्या आंदोलन केले होते. तर काही अज्ञातांनी विखे समर्थकांच्या गाड्या तोडफोड करत पेटवून दिल्या होत्या. यामुळे सभास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता.

जयश्री यांच्याबाबत सुजय विखेंच्या सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संगमनेरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात जयश्री थोरात, डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबेंसह कार्यकर्त्यांनी रात्रीपासून सकाळी ६ वाजेपर्यंत पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. दरम्यान, या प्रकरणात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले होते.

जयश्री यांच्यासह अनेक जणांविरोधात गुन्हा

काँग्रेसच्या युवा नेत्या जयश्री थोरात यांच्यासह अनेक जणांच्याविरोधात भाजप नेत्याच्या गाड्याचे नुकसान केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींनी भाजप नेत्याच्या वाहनांवर हल्ला करून ती जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले. बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात व त्यांच्या समर्थकांनी संगमनेरमधील भाजप नेते वसंतराव देशमुख यांच्याविरोधात जोरदार आंदोलन व निदर्शने केली. संगमनेर शहर पोलिसांनी सांगितले की, जयश्री यांच्याविरोधात आम्ही दोन गुन्हे दाखल केले आहेत. तसेच २४ जणांविरोधात तर २५ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in