वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, मनसेच्या १७ शाखाध्यक्षांनीही हाती घेतली मशाल

वसंत मोरे यांच्यासोबत मनसेचे १७ शाखाध्यक्ष, महिला कार्यकर्त्यांनी मशाल हाती घेतली.
वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, मनसेच्या १७ शाखाध्यक्षांनीही हाती घेतली मशाल

मुंबई: वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिट्ठी दिल्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत वसंत मोरे यांनी शिवबंधन हाती बांधलं. यावेळी वसंत मोरे यांच्यासोबत मनसेचे १७ शाखाध्यक्ष, महिला कार्यकर्त्यांनी मशाल हाती घेतली. आपण स्वगृही परतत असल्याची भावना वसंत मोरे यांनी यावेळी व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंनी केलं स्वागत...

उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेनेत स्वगृही परतलेल्या सर्व बांधवाचे स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीच्या आधी वसंतराव काय करताय याकडे सर्वांचे लक्ष होते. काय करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. वसंत मोरे आधी शिवसैनिक होते. मधल्या काळात ते दुसऱ्या पक्षात गेले. इतर पक्षात सन्मान मिळतो का? काय वागणूक दिली जाते? याचा अनुभव घेऊन अधिक परिपक्व होत आता ते स्वगृही परतले आहेत.”

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीपूर्वी वसंत मोरे यांनी मनसेतून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी वंचितमधून लोकसभा निवडणूकही लढवली. या निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर आता वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकिय विश्वात सुरु होती. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी गेल्या महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर वसंत मोरेंनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.

logo
marathi.freepressjournal.in