वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार, संजय राऊतांचा मोठा खुलासा

वसंत मोरे लवकरच शिवसेनेत (ठाकरे गटात) प्रवेश करतील, असा खुलासा संजय राऊत म्हणाले.
वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार, संजय राऊतांचा मोठा खुलासा

मुंबई: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीपूर्वी वसंत मोरे यांनी मनसेतून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. वंचितमधून त्यांनी लोकसभा निवडणूकही लढली. लोकसभा निवडणूकीत दारूण पराभव झाल्यानंतर आता वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकिय विश्वात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी भेट घेणार आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वसंत मोरे यांच्या उद्धव ठाकरेंच्या भेटीमागचं कारण स्पष्ट केलं आहे. वसंत मोरे लवकरच शिवसेनेत (ठाकरे गटात) प्रवेश करतील, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

वसंत मोरे आज उद्धव ठाकरेंची भेट का घेणार आहेत, या प्रश्नाचं उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, "भेट घ्यायला काय हरकत आहे. ते एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत. लोकसभाही लढलेत. पुण्यात त्यांचं सामाजिक, राजकिय कार्य चागंल आहे. ते आज दुपारी उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत, हे खरं आहे आणि ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, हेदेखील तितकंच खरं आहे."

अजित दादांनी काकांचा पक्ष चोरला-

अजित पवार यांचा एक व्हिडिओ शेअर होत आहे. मी आजपर्यंत कधीच पक्ष बदलला नाही, अशा आशयाचं विधान यामध्ये अजित पवार यांनी केलेलं आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "त्यांनी (अजित पवार) पक्ष बदलला नाही पण काकांचा मूळ पक्ष चोरला, त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे. त्यांनी सरळ सरळ केलेलं पक्षांतर आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा नसते, तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा महाराष्ट्र द्रोह उफाळला नसता तर बाळासाहेबांची शिवसेना धनुष्यबाणासह एकनाथ शिंदे यांना मिळाली नसती."

logo
marathi.freepressjournal.in