
सिंधुदुर्ग : वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी गावात कासव संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर आणखी एक वादग्रस्त जमीनखरेदी प्रकरण पुढे आले असून जमीन मालकाने तर चक्क 'सीआरझेड' कायद्याचे उल्लंघन करत अतिक्रमण केल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
याबाबतची तक्रार तिथल्या रहिवासी सुष्मिता साळगावकर आणि सावी साळगावकर यांनी जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक यांच्याकडे केली आहे.
वायंगणीतील या भूमाफियाने आपल्या जमिनीवर समुद्रापासून केवळ वीस मीटर पेक्षाही कमी अंतरावर वाळूचा बेकायदा बंधारा बांधला असून त्यावर काटेरी कुंपणही घातले आहे. परिणामी अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांना मोठा अडथळा निर्माण झाला आहेच, शिवाय त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.
या किनाऱ्यावरील' कासव वीण क्षेत्र '(टॉरटॉईस नेस्टिंग पॉईंट) हे संवेदनशील क्षेत्रात मोडते. कायद्यानुसार तसेच किनाऱ्यासंबंधीच्या नकाशात तसे नमूद करण्यात आलेले आहे. या क्षेत्रात कोणत्याही प्रकारची बांधकामे, विकास कामे अनुज्ञेय नाहीत. असे असतानाही उघडपणे अतिक्रमण करणे हा कायद्याचा उघड उघड भंग आहे.
या प्रकरणी ग्रामपंचायतीचे लक्ष वेधण्यात आले असता,'याबाबत कोणाचीही लेखी तक्रार प्राप्त नाही 'असे सांगत तक्रारदारांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मात्र काही ग्रामस्थाच्या आक्रमक पावित्र्यानंतर ग्रामसेवक आणि तलाठ्याने संयुक्त सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सावंतवाडीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांना पाठवला मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही,असा आरोप करण्यात येत आहे.
ग्रामस्थांचा आरोप
स्थानिक ग्रामस्थांच्या मते सदरची जमीन ही १९९६-९७ मध्ये बोगस आणि बनावट कागद पत्रे सादर करून सुमारे ८० गुंठे जमीन खरेदी करण्यात आली असून काही राजकारणी मंडळी, जमीनींचे दलाल आणि अधिकारी यांच्या संगनमतांने समुद्र किनाऱ्यावर 'प्लॉटींग करून किंवा बड्या हॉटेलला ती विकण्याचा घाट घातला जात आहे.