कंत्राटी भरतीविरोधात वंचित आघाडी रस्त्यावर ; सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर विरोट मोर्चा

या मोर्चामध्ये जिल्ह्यातील हजारो बेरोजगार आणि वंजित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते
कंत्राटी भरतीविरोधात वंचित आघाडी रस्त्यावर ; सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर विरोट मोर्चा
Published on

कंत्राटी नोकरभरती वरुन राज्यातचं वातावरण तापलं आहे. कमिशनसाठी कंत्राटी नोकरभरती केली जात असून बेरोजगारांना देशोधडीला लावण्याचा उद्योग सरकारने बंद करावा, अन्यथा तरुणांच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मंगळवारी (२६ सप्टेंबर) सांगलीत दिला. राज्यात होत असलेल्या कंत्राटी नोकरभरतीला विरोध दर्शवण्यासाठी सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मंगळवार रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला.

सांगलीतील विश्रामबाग चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील हजारो बेरोजगार आणि वंजित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी सुजात यांनी देशातील बेरोजगारी, सरकारची धोरणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाचा कारभार चालवण्याच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.

ज्या पद्धतीने मोदी निर्णय घेत आहेत. किंवा राज्यकारभार करत आहेत. ते पाहता त्यांनी देश विकायला काढला आहे. अशी घणाघाती टीका यावेळी सुजात आंबेडकर यांनी केली. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना शासकीय नोकऱ्यांमध्ये परिक्षांमध्ये घोटाळे होत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार बंद करा. अन्यथा सरकारला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल. असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

ते म्हणाले की, शासनाने ६ सप्टेंबर रोजी खासगी कंपन्यांशी संगनमत करुन राज्यातील नोकरभरतीचा घातकी निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांचे हे कारस्थान आहे. पंधरा ते वीस टक्के कमिशनवर ही नोकरभरती होत आहे. भविष्यात हा भस्मासूर वाढतच जाणार असून इंग्रजांप्रमाणेचं देश लुटण्याचं हे कारस्थान असल्याचंही सुजात आंबेडकर यावेळी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in