वेरूळ-अजिंठा ‘पूर्वरंग’ थाटात सुरू; २८ जानेवारीपर्यंत आयोजन : ऑनलाईन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र शासन, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, महाराष्ट्र टुरिझम, वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव समिती आणि स्मिता हॉलिडेजच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ‘पूर्वरंग’ कार्यक्रमास शनिवारी थाटात सुरुवात झाली.
वेरूळ-अजिंठा ‘पूर्वरंग’ थाटात सुरू; २८ जानेवारीपर्यंत आयोजन : ऑनलाईन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासन, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, महाराष्ट्र टुरिझम, वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव समिती आणि स्मिता हॉलिडेजच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ‘पूर्वरंग’ कार्यक्रमास शनिवारी थाटात सुरुवात झाली.

या कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून प्रचंड प्रमाणात पासेस मिळविण्याकरिता नागरिक स्मिता हॉलीडेजच्या कार्यालयात भेट देत आहेत. हा अभूतपूर्व सांस्कृतिक सोहळा पाहण्याकरिता छत्रपती संभाजीनगरकर सज्ज झाले आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, नागरिक, रसिक कलावंत मंडळी या कार्यक्रमाची प्रशंसा करताना दिसून येत आहे. http://elloraajantainternationalfestival.com/ या संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात येत आहे. नागरिकांनी या संकेतस्थळ भेट देऊन याची संपूर्ण माहिती घेता येईल. विविध नामवंत कलाकारांच्या सादरीकरण अनुभवण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरकरांना मिळणार असून एकापेक्षा एक कार्यक्रमाची पर्वणी असणार आहे. वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव २०२४ या कार्यक्रमाचा "पूर्वरंग" हा दि २० व २१ जानेवारी रोजी संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी सायंकाळी सहा वाजेपासून रंगत आहे. २० जानेवारी रोजी निधी प्रभू यांचे 'अनुभूती' कथक नृत्य रंगणार असून निधी यांनी अनेक चित्रपटामधून डान्स कोरिओग्राफी केलेली आहे. बाजीराव मस्तानी चित्रपटातील 'मोहे रंग दो लाल' या गाण्यामध्ये माधुरी दीक्षित, एकता कपूर अशा दिग्गज कलाकारांसोबत निधी यांनी काम केले आहे. 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या कार्यक्रमात डान्स सादर करत त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविले आहे. त्यांचा या कार्यक्रम साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. सोबतच, मराठवाड्याच्या दमदार आवाजाचे शाहीर रामानंद उगले आपल्या शाहिरी बाण्यातून आपली कला सादर करणार आहे. रामानंद उगले हे आपल्या कसदार आवाजाने संपूर्ण भारतभरात प्रसिद्ध झालेले आहे. भजन, भारूड, पोवाडा, वासुदेव, लोकगीत, जागरण गीत, गोंधळ, शाहिरी, लावणी, बतावणी अशा अनेक लोककलेत पारंगत असलेले युवाशाहीर रामानंद उगले यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी या दिवशी रसिकांना मिळणार आहे. या दोन्ही बहारदार कार्यक्रमासोबतच मराठवाड्याचे भूमिपुत्र प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे आपल्या सहकलाकारांसोबत परफॉर्मन्स करणार आहेत. सोबतच ढोलकी सम्राट पांडुरंग घोटकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कलावंत आणि लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर, प्रमिला लोदगेकर यांचा कलाविष्कार रसिकांना अनुभवायास मिळणार आहे.

पर्यटनाला चालना मिळावी

‘‘वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित 'पूर्वरंग' सोहळ्याने शहरात चांगलीच वातावरण निर्मिती करण्याचा आमचा मानस असून याठिकाणी पर्यटन आणि सांस्कृतिक मेजवानीच्या रूपाने देशाच्या पटलावर छत्रपती संभाजीनगर शहराचे नावलौकिक व्हावे यासाठी आम्ही वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शहरवासीयांना जोडण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहोत.’’ - जयंत गोरे, संस्थापक, स्मिता हॉलिडेज

logo
marathi.freepressjournal.in