‘स्वारातीम’च्या कुलगुरूपदी डॉ. मनोहर चासकर रूजू

पदभार स्वीकारताना डॉ. चासकर म्हणाले की, आपल्या सर्वांच्या सहकार्याने या विद्यापीठाला एका उंचीवर नेण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.
‘स्वारातीम’च्या कुलगुरूपदी डॉ. मनोहर चासकर रूजू

नांदेड : राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. मनोहर चासकर यांची शनिवारी (दि. १७) नियुक्ती केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधून डॉ. मनोहर चासकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्याकडून स्वीकारला.

पदभार स्वीकारताना डॉ. चासकर म्हणाले की, आपल्या सर्वांच्या सहकार्याने या विद्यापीठाला एका उंचीवर नेण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. या विद्यापीठाचा स्थर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावर नेण्यासाठी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानुन आपण काम करू, माझे काम पूर्णपणे पारदर्शक असेल. आणि मी या पदाला प्रामाणिकपणे न्याय देईल, अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.

यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, अधिष्ठाता, विद्याशाखेचे सदस्य, संविधानिक अधिकारी, विद्यापीठातील संकुलाचे संचालक, शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

‘स्वारातीम’ला केंद्राचे २० कोटींचे अनुदान

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षण अभियानातर्फे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास २० कोटी रुपयाच्या अनुदानास मंजुरी मिळाली असल्याची माहिती विद्यापीठास्तरीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

या अनुदानातून मुख्यतः विद्यापीठातील मुलींचे वस्तीगृह, सौरऊर्जा, कौशल्य विकास इत्यादींचा विकास करण्यात येणार आहे. देशभरातील ७८ विद्यापीठांना अशा प्रकारचे अनुदान देण्यात आलेले आहे. त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा समावेश आहे.

या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि. २०) सकाळी ११ वाजता जम्मू येथून दुरदृश्य प्रणालीद्वारे या योजनेचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते या योजनेवर सविस्तर मार्गदर्शनही करणार आहेत. यानिमित्त विद्यापीठ कार्यक्षेत्रातील खासदार, आमदार, शिक्षणतज्ञ, प्राध्यापक व विद्यार्थी इत्यादींनी सदरील ऑनलाईन कार्यक्रमास विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in