
नागपूर/चंद्रपूर : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर आणि विदर्भात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूरमध्ये गेल्या २४ तासांत २०२.४ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चंद्रपूरमध्ये नद्या, नाले तुडुंब भरून वाहत असून गोसेखुर्द धरणाची दारे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीची पाणीपातळी वाढली आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील शाळांना मुसळधार पावसामुळे बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
नागपूरमध्ये मंगळवारपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे सावनेर तालुक्यातील चंद्रभागा आणि कोलार नद्यांना पूर आला आहे. हुडकेश्वर आणि विहीरगाव परिसरात काही लोक पाण्यात अडकले होते. अग्निशमन विभागाने ६ जणांना सुखरूप बाहेर काढले. ग्रामीण भागात नद्यांना पूर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना चंद्रपूरमध्ये गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ४९.८ मिमी पावसाची नोंद झाली. ब्रह्मपुरीत १६२.८, तर नागभीड तालुक्यात १५२.४ मिमी पावसाची नोंद झाली. ब्रह्मपुरी तालुक्यातील ब्रह्मपुरी-वडसा, ब्रह्मपुरी-बोरगाव, ब्रह्मपुरी कन्हाळगाव आणि ब्रह्मपुरी-पारडगाव हे मार्ग बंद झाले आहेत. अहेरनवरगाव येथील पंढरी उरकुडे आणि नंदलाल ठेंगरे यांच्या घराची भिंत कोसळली. नागभीड तालुक्यातील मांगली नागभीड, मौशी-ब्रह्मपुरी, नागभीड-डोंगरगाव, नागभीड-नवेगाव हे मार्ग बंद पडले आहेत.
भंडाऱ्यात गेल्या २४ तासात ११४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. गावा-खेड्यात, सोसायटी व वस्ती भागात पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भंडारा, तुमसर, मोहाडी, साकोली व लाखांदूर तालुक्यातील काही गावात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तरुणाचा मृत्यू, अन्य एक जण वाहून गेला
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव येथील रहिवासी अनिल पानपट्टे (३५) हे वाहत्या गटारात पडून वाहून गेले, तर उप्पलवाडी येथे कार्तिक लाडसे (१८) हा तरुण भरून वाहत गटारात पडल्याने मृत्यूमुखी पडला. त्याचा मृतदेह नंतर सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला असून विधानसभा सभागृहात पूर्व विदर्भातील मुसळधार पावसासंदर्भात माहिती दिली. फडणवीस म्हणाले की, पावसामुळे एसटी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना जवळच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले व नंतर सर्व प्रवाशांना सुखरूप घरी पाठवण्यात आले आहे. गडचिरोली ते नागपूर (आरमोरी) मार्ग सध्या बंद असून, वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्यात आल्याने, गडचिरोलीपर्यंत सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर परिस्थिती लक्षात घेता एनडीआरएफ आणि एसडीआरएफ या दोन्ही यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले असून, नागपूर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.”