विदर्भवादी पत्रकाराची अधिवेशनात घोषणाबाजी; प्रकाश पोहरे पोलिसांच्या ताब्यात

या पार्श्वभूमीवर नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनातही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
विदर्भवादी पत्रकाराची अधिवेशनात घोषणाबाजी;
प्रकाश पोहरे पोलिसांच्या ताब्यात
PM

नागपूर : संसदेत अभ्यागतांच्या गॅलरीतून उडी मारून दोन तरुणांनी गोंधळ उडवल्याचे प्रकरण ताजे असतानाच गुरुवारी ज्येष्ठ पत्रकार व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी सायंकाळी विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत येऊन विदर्भाच्या मुद्यावर आमदारांना उद्देशून घोषणाबाजी केली. याची गंभीर दखल घेत तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. घोषणाबाजीनंतर लगेच पोहरे सभागृहाबाहेर पडले. तेथे विधिमंडळ सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले.

बुधवारी संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन युवकांनी सभागृहात उडी घेतल्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनातही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. प्रेक्षक गॅलरीत बसणाऱ्या प्रत्येकाची योग्य तपासणी करूनच प्रवेश दिला गेला. दिवसभराच्या कामकाजानंतर मराठा आरक्षणावर चर्चा सुरू असताना सायंकाळी ७.४० च्या सुमारास पत्रकार प्रकाश पोहरे पत्रकार गॅलरीत येऊन बसले. काही वेळातच ते उभे राहिले व सभागृहात बसलेल्या आमदारांना उद्देशून विदर्भात अधिवेशन होत असल्याचे सांगत विदर्भाच्या प्रश्नांवर बोलणार की नाही, असे मोठमठ्याने विचारू लागले. विदर्भात अधिवेशन कशासाठी घेता, असेही ते आमदारांना ओरडून म्हणाले. यामुळे सभागृहाच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला. आमदारांनी यावर आक्षेप घेतला.

ही कसली सुरक्षा-शेलार

भाजपचे मुख्य प्रतोद आशिष शेलार यांनी ‘ही कसली सुरक्षा,’ असा सवाल केला. ‘काल संसदेत घडलेल्या घटनेनंतरही विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत कोणी तरी येतो, अध्यक्षांकडे हातवारे करून घोषणाबाजी करतो, कोण आहे ही व्यक्ती, त्यांना प्रवेश कसा मिळाला, विधानसभेची सुरक्षा कशी काय भेदली,’ असे प्रश्न उपस्थितीत करुन या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी ती मान्य करीत चौकशीचे आदेश दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in