विदर्भात १० दिवसांत १६ पाऊसबळी

विदर्भातील सुमारे ५४ हजार हेक्टर लागवडीखालील क्षेत्राला या पावसाचा फटका बसला आहे
विदर्भात १० दिवसांत १६ पाऊसबळी

नागपूर/अमरावती : नेहमीच विदर्भाला खो देणाऱ्या पावसाने यंदा मात्र चांगलेच झोडपून काढले असून, जीविताची मोठी हानी केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, गेल्या १० दिवसांत विदर्भात अतिपावसामुळे १६ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, सुमारे १६०० घरे उद‌्ध्वस्त झाली आहेत. तसेच आणखी साडेचार हजार घरांचे नुकसान झाले आहे.

यापेक्षा अधिक नुकसान शेतीचे झाले आहे. विदर्भातील सुमारे ५४ हजार हेक्टर लागवडीखालील क्षेत्राला या पावसाचा फटका बसला आहे. यापैकी ५३ हजार हेक्टर केवळ अमरावती विभागातील आहे. गेल्या २४ तासांत यवतमाळ जिल्ह्यात ३१६ मिमी पावसाची नोंद झाली असून, तेथे आता सरासरीपेक्षा ८ टक्के जादा पाऊस झाला आहे. शनिवारी यवतमाळमधील अनेक ठिकाणी पूर आले होते. या तुलनेत गेल्या २४ तासांत नागपूर जिल्ह्यात ३९.६ मिमी पाऊस पडला आहे. संततधारेमुळे यवतमाळमधील अनेक घरे आणि रस्ते पुराच्या पाण्याने भरले होते. यामुळे सुमारे २७९६ लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

१३ जुलैपासून नागपूर जिल्ह्यातील गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात पावसाने प्रत्येकी तीन बळी घेतले आहेत, तर वर्धा व गोंदिया येथे प्रत्येकी दोन आणि चंद्रपूर जिल्ह्यात एक बळी गेला आहे. अमरावतीमध्ये परिस्थिती अधिकच खराब असून, तेथे २१ जुलै रोजी एकाच दिवसात चार जण दगावले आहेत. तसेच यवतमाळमध्ये तीन जण पावसाचे बळी ठरले आहेत. याच कालावधीत अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक व्यक्ती पावसामुळे दगावली आहे. विदर्भाचे ११ जिल्हे अमरावती आणि नागपूर अशा दोन विभागांत विभागण्यात आले आहेत. नागपूरमध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा यांचा समावेश आहे, तर अमरावतीमध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा यांचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून विदर्भात जोरदार पाऊस पडत आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत अकोल्यात १०७.९ मिमी, तर यवतमाळमध्ये २४ मिमी, वर्धा २३.४ मिमी, अमरावती १५.६ मिमी, नागपूर ६.७ मिमी, गडचिरोली ३ मिमी, गोंदिया २.२ मिमी, ब्रह्मपुरी २.४ मिमी, बुलढाणा २ मिमी पाऊस पडला आहे. प्रशासनाकडून मृतांच्या नातेवार्इकांना ४ लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच १६०० पूरग्रस्तांना ५ हजारांपेक्षा अधिक मदत करण्यात आली आहे. शनिवारी अकोल्यात दोन व्यक्ती पुरामध्ये वाहून गेल्याची नोंद आहे. अजून त्यांचे मृतदेह सापडले नाहीत, तर वाघाडी गावात घर कोसळल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अकोल्यात एक ३२ वर्षांचा तरुण नदीत वाहून गेला आहे, तर बुलढाण्यात ४७ वर्षांच्या व्यक्तीला जलसमाधी मिळाली आहे.

५३ हजार हेक्टर शेतीला फटका

प्राथमिक माहितीनुसार, अमरावती क्षेत्रात ५३०५६ हेक्टर शेत जमिनीला अति पावसाचा फटका बसला आहे. तसेच एकूण २८८२ घरांचे नुकसान झाले आहे. त्यात १४३२ यवतमाळमधील, तर १४२४ अकोल्यातील घरांचा समावेश आहे. तसेच वाशिममध्ये १४, तर अमरावतीत १२ घरांचे नुकसान झाले आहे. तसेच ५९ जनावरांना अमरावती क्षेत्रात जलसमाधी मिळाली. पावसामुळे नागपूर विभागात ८७५.८४ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले असून, त्यात चंद्रपूर ८५३.७४ हेक्टर, वर्धा २२.१ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in