Video| पुणे : असा झाला कुख्यात गुंड शरद मोहोळचा 'गेम'; CCTV व्हिडिओ आला समोर

Video| पुणे : असा झाला कुख्यात गुंड शरद मोहोळचा 'गेम'; CCTV व्हिडिओ आला समोर

गोळी लागताच मोहोळच्या हातातील दोन्ही मोबाईल फोन खाली पडतात आणि तो जमिनीवर कोसळतो.

कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी, त्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूड परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. आता त्याच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, शरद मोहोळ एका गल्लीतून चालत असताना अचानक त्याच्या डाव्याबाजूने आलेला एक जण आणि त्याच्या मागून चालणारा एक जण त्याच्यावर गोळीबार करताना दिसत आहे. गोळी लागताच मोहोळच्या हातातील दोन्ही मोबाईल फोन खाली पडतात आणि तो जमिनीवर कोसळतो. मोहोळसोबत असलेले दोन साथीदार लगेचच हल्लेखोरांना पकडण्यासाठी धावतात, पण त्यांना पळून जाण्यात यश येते.

आठ जण पोलिसांच्या ताब्यात -

शरद मोहोळचा शुक्रवारी लग्नाचा वाढदिवस होता. तो मंदिरात चालला होता. त्यावेळी अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी पसार झाले. या प्रकरणात पोलिसांनी तीन पथके रवाना केले होती. त्यानंतर काही तासांत आठ जणांना ताब्यात घेतले असून या प्रकरणात मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असल्याचे समोर आले आहे. साहिल हा शरद मोहोळ याचा साथीदार आहे. सात दिवसांपूर्वीच तो गँगमध्ये आला होता आणि त्यानेच संधी साधत गेम केल्याचे समोर आले आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

दरम्यान, सध्या शरद मोहोळ याने मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यक्रम सुरू केल्याने त्याच्या राजकीय पुनर्वसनची चर्चा सुरू झाली होती. शरद मोहोळ हा पुण्याच्या कोथरूड परिसरातील कुख्यात गुन्हेगार होता. मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक झाली.

येरवडा कारागृहात शरद मोहोळने विवेक भालेराव याच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागाचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला होता. या प्रकरणात शरद मोहोळला जामीन मिळाला. मात्र, बाहेर आल्यानंतर त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरूच होती. जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडिपार करण्यात आले होते.

गुंडांचा शासन बंदोबस्त करेल -फडणवीस

गुंड शरद मोहोळ याच्या हत्येवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, “या घटनेमुळे राज्यात कुठेही टोळीयुद्ध होणार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होणार नाही. या कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली आहे. गुंड कुणीही असो, त्याचा बंदोबस्तच शासनाद्वारे केला जातो. त्यामुळे असे टोळीयुद्ध करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही.”

logo
marathi.freepressjournal.in