
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका बसला. आगामी विधानपरिषद निवडणुकीपूर्वी सर्व पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 20 जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. ही निवडणूक गुप्तपणे होणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चुरस असल्याची चर्चा आहे. विधान परिषदेचे अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. शेवटच्या पंधरा मिनिटापर्यंत एकाही पक्षाकडून अर्ज मागे घेण्यात आला नव्हता.
मात्र अखेरच्या क्षणी भारतीय जनता पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी मागे घेतली. अशा स्थितीत आता भाजपचे पाच उमेदवार रिंगणात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदाभाऊ खोत यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता.
दुसरीकडे काँग्रेस आपला एक उमेदवार मागे घेणार असल्याची चर्चा होती, मात्र काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला नाही. त्यामुळे या जागांवर आता 11 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेची निवडणूकही अवघड होण्याची शक्यता आहे.