विधान परिषद निवडणूक : भाजप ११, शिवसेना ४, तर राष्ट्रवादी २ जागा लढणार; महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या १७ जागांवरून महायुतीत रस्सीखेच झाल्यानंतर रविवारी अखेर जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार भाजप ११, शिवसेना ४, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २ जागा लढवणार आहे, तर विरोधी पक्ष महाविकास आघाडीत नांदेड आणि नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे.
विधान परिषद निवडणूक : भाजप ११, शिवसेना ४, तर राष्ट्रवादी २ जागा लढणार; महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब
Published on

मुंबई : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या १७ जागांवरून महायुतीत रस्सीखेच झाल्यानंतर रविवारी अखेर जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार भाजप ११, शिवसेना ४, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २ जागा लढवणार आहे, तर विरोधी पक्ष महाविकास आघाडीत नांदेड आणि नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आलेल्या ११ जागांमध्ये नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव- लातूर - बीड,  छत्रपती संभाजीनगर -जालना, जळगाव, सोलापूर,  नांदेड, अमरावती, वर्धा-गडचिरोली -चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि सातारा-सांगली या मतदारसंघांचा समावेश आहे. यातील बहुतांश जागांवर भाजपचे प्राबल्य आहे. त्यामुळे या जागा जिंकून विधान परिषदेतील आपले संख्याबळ वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सुरुवातीला ७ जागांची मागणी लावून धरली होती. त्यासाठी शिंदेंनी थेट दिल्ली गाठून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा केली. मात्र, या वाटाघाटीत त्यांना ४ जागा मिळाल्या.  शिंदे यांनी प्रतिष्ठेची केलेली छत्रपती संभाजीनगर - जालना ही जागा मिळू शकली नाही. शिवसेनेला  ठाणे, नाशिक, परभणी-हिंगोली आणि यवतमाळ या चार जागा मिळाल्या आहेत.  रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिंदे यांना  रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघावरील दावा सोडावा लागला.

कोकणात राष्ट्रवादीच्या विरोधात बंड

विधान परिषदेची रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा राष्ट्रवादीकडे गेली आहे. या  जागेवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली जाणार आहे. तटकरे पिता-पुत्रांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनिकेत तटकरे हे कोकणातील उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित झाले आहे. तटकरेंच्या उमेदवारीमुळे शिवसेनेत नाराजी आहे. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. यामुळे शिवसेना आणि तटकरे यांच्यातील संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

  • दरम्यान, विधान परिषदेच्या परभणी - हिंगोली मतदारंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून डॉ. विवेक नावंदर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सांगली-सातारामधून बाळासाहेब उर्फ बापू पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. पाटील हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in