
काही महिन्यांपूर्वी झालेल्या महाराष्ट्रातील बंडानंतर राज्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. यांनतर महाविकास आघाडीचे सरकार पाडून, भाजपने शिंदे गटासोबत नवे सरकार स्थापन केले. तर, शिवसेनेशी बंड करून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. पण बंडाचे बीज पेरल्याचा दावा शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडी बनवण्याचा विचार हा निवडणुकीपूर्वीच ठरला होता, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
माजी आमदार विजय शिवतारे यांचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये ते म्हणाले की, "महाविकास आघाडी ही निवडणुकी अगोदरच झाली होती. ते सर्वांची फसवणूक करत आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्या मनात उठावाचे बीज मीच पेरले होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार आले, ते महाराष्ट्राच्या हिताचे नव्हते. हे सरकार आल्यानंतर दोन महिन्यानंतरच मी नंदनवनला गेलो होतो. एकनाथ शिंदे यांच्याशी साडेचार तास चर्चा केली आणि आमच्यात ही चर्चा झाली. एकनाथ शिंदेंना मी सरळ म्हंटले की हे चालणार नाही. हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही, तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा, नाहीतर थोडा दबाव टाका ही युती तोडली पाहिजे. भाजप आणि शिवसेनेचे सरकार आले पाहिजे."