काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते ; विधानसभा अध्यक्षांची सभागृहात घोषणा

विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार आणि संग्राम थोपटे या नावांची चर्चा सुरु होती
काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते ; विधानसभा अध्यक्षांची सभागृहात घोषणा

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यातील समीकरणे बदलली. अजित पवार यांच्या सरकारसोबत जाण्याने तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील बंडानंतर काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ वाढलं आहे. यामुळे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा विरोधी पक्षनेता दिला जाईल यावर शिक्कामोर्तब झालं होतं. यामुळे विरोधीपक्षनेते पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार आणि संग्राम थोपटे या नावांची चर्चा सुरु होती. अखेर विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर सभागृहाकडून वडेट्टीवार यांचं अभिनंदन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्व:ता विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं. यावेळी विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "मी विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन करतो. आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातील आहेत. विजय वडेट्टीवार हे देखील विदर्भातील आहेत. देशाच्या राष्ट्रपती देखील विदर्भाच्या सून होत्या. विजय वडेट्टीवार यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांना सुरुवातीला करायला हवं होतं. मात्र, आता शेवटच्या काळात त्यांना पद मिळालं. तुम्हाला शेवटच्या काळात पद मिळते. त्यानंतर तुम्ही खुप काम करता आणि सरकार आलं की तुमचा पक्ष तुम्हाला विसरुन जातो. इथून पुढे असं होऊ नये हीच अपेक्षा. २०२४ मध्ये आम्ही पुन्हा सत्तेवर येणार आहोत. त्यावेळी देखील तुम्ही विरोधी पक्षनेते व्हालं." असं शिंदे म्हणाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ते म्हणाले, विजय वडेट्टीवार वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाहीत. ते रस्त्यावर उतरुन काम करणारे नेते आहेत. रस्त्यावर उतरुन काम करायला हिंमत लागते आम्ही तेच केलं. संकट आल्यावर लपायचं नसतं त्याला समाोरे जायचं असतं, असं म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना कोपरखळी मारली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले की, राज्याला सक्षम विरोधी पक्षनेते मिळाले आहेत. शासन चुकलं की त्यांना त्यांची चूक दाखवून देणं हे विरोधी पक्षनेत्याचं काम असतं. या महत्वाच्या पदावर दुसऱ्यांदा वडेट्टीवार बसले असून त्या पदाचा मान ते वाढवतील. विजय वडेट्टीवार यांना माईकची गरज नाही, असं फडणवीस म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in