"अशा मंत्र्यांना लाथ मारुन बाहेर काढा" ; अब्दुल सत्तारप्रकरणी वडेट्टीवार भडकले: म्हणाले, "सत्तेसाठी हपापलेल्या, सत्तापिपासू लोकांनो..."

"ही भाषा गुंड प्रवृत्तीची भाषा, मस्तीची भाषा या सरकारला हे अभिप्रेत असेल तर त्यांचे पाय दाबत त्यांचा सत्कार त्यांनी करावा, थोडीतरी जरी लाज वाटत असेल तर क्षणाचा विलंब न करता या व्यक्तीला बाहेर काढा," असे आव्हानही वडेट्टीवारांनी यावेळी केले.
"अशा मंत्र्यांना लाथ मारुन बाहेर काढा" ; अब्दुल सत्तारप्रकरणी वडेट्टीवार भडकले: म्हणाले, "सत्तेसाठी हपापलेल्या, सत्तापिपासू लोकांनो..."

राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवशी आयोजित गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्यांना सत्तारांनी घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. त्यावर राज्याचे विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्तारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करत महायुती सरकारलाही धारेवर धरले.

"अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. त्यांची संस्कृती, त्यांची भाषा अब्दुल सत्तारांच्या मुखातून आता बाहेर पडत आहे. अब्दुल सत्तारांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या चेहऱ्यावरचा पडदा टराटरा फाडला आहे", असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे.

"सत्तेसाठी हपापलेल्या लोकांनो, सत्तापिपासू लोकांनो, जर तुम्हाला थोडी लाज वाटत असेल तर, अशा मंत्र्यांना लाथ मारुन बाहेर काढण्याची ताकद तुम्ही दाखवा", असेही वडेट्टीवार म्हणाले.

"हे मंत्री आहेत की गुंड? मंत्रिमंडळामध्ये असे मंत्री आहेत म्हणजे हे सरकार कसे असेल, यांचे विचार कसे असतील, आई बहिणीच्या संदर्भात, आई वडिलांच्या संदर्भात ज्या भाषेचा वापर केला आहे. अरे कुठे नेवून ठेवताय महाराष्ट्र आमचा, सत्तेसाठी हपापलेल्या लोकांनो, सत्तापिपासू लोकांनो, जर तुम्हाला थोडी लाज वाटत असेल तर, अशा मंत्र्यांना लाथ मारुन बाहेर काढण्याची ताकद तुम्ही दाखवा" असे म्हणत त्यांनी सत्तार यांच्यासह महायुती सरकारवर टीका केली. "ही भाषा गुंड प्रवृत्तीची भाषा, मस्तीची भाषा या सरकारला हे अभिप्रेत असेल तर त्यांचे पाय दाबत त्यांचा सत्कार त्यांनी करावा, थोडीतरी जरी लाज वाटत असेल तर क्षणाचा विलंब न करता या व्यक्तीला बाहेर काढा," असे आव्हानही त्यांनी यावेळी केले.

काय आहे प्रकरण?

अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी केली, त्यांना आवरण्यासाठी मंत्री महाशयांनी शिवीगाळ करीत पोलिसांना थेट लाठीचार्ज करण्यास सांगितले. सत्तार म्हणाले, “अरे खाली बस नाहीतर बाहेर जा. पोलिसवाले यांच्यावर लाठीचार्ज करा. त्यांना इतके मारा त्यांच्या *ची हड्डी तोडून टाका. * तुझ्या बापाने कधी पाहिला होता का कार्यक्रम, तू राक्षस आहे का? माणसाची औलाद आहे माणसासारखा कार्यक्रम पाहा. एक हजार पोलिस आहेत, हाणा यांना ५० हजार लोकांना, काय फरक पडतो. हे जे बोगस लोक आहेत, हे फक्त वाद घालण्यासाठी आले आहेत. ए बस ना खाली तुझ्या घरी पण असाच उभा राहतो का? तुझ्या आई वडिलांचा पिक्चर पाहतो का ? यांना दुसरी भाषा कळत नाही”, अशी अर्वाच्च भाषा त्यांनी वापरली.

अब्दुल सत्तारांकडून सारवासारव -

"विरोधकांनी गोंधळ घालण्यासाठी हुल्लडबाज पाठवली होती. पाच पंचवीस हुल्लडबाज लोकांना पाठवून कार्यक्रम फेल व्हावा, कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा, कार्यक्रम उधळण्याचा कट होता. त्यांना कंट्रोल करण्यासाठी मी आमच्या ग्रामीण भागाची बोली आहे, त्या शब्दामध्ये बोललो. त्याच्यामुळे कोणाच्याही मनामध्ये काही शंका-कुशंका झाली असेल तर, मी निश्चीत त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सिल्लोडमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला कोणीही गालबोट लावण्याचे काम करु नये. मी जे शब्द बोललो त्या शब्दांबद्दल कोणाची मने दुखले असतील तर परत एकदा मी खेद व्यक्त करतो", असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी कालच्या घटनेवर आपले स्पष्टीकरण दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in