विजय वडेट्टीवार यांची नांदेडच्या रुग्णालयाला भेट ; रुग्णांच्या नातेवाईकांनी फोडला टाहो
राज्यात नांदेडमध्ये २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील रुग्णायातील भीषण वास्तव समोर आलं आहे. या घटनेवरुन राज्यभर वातावरण तापलं असून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकाला चांगलचं धारेवर धरलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज नांदेड येथील शासकीय रुग्णालयात जाऊन पाहणी केली. तसंच रुग्णालयात उपचार करणाऱ्या रुग्णांच्या आमि मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी विरोधी पक्षनेत्यांसमोरच टाहो फोडल्याचं पाहायला मिळालं.
या प्रकरणावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, नांदेड शासकीय रुग्णालयातील घटना हृदय पिळून टाकणारी आहे. कुटुंबीय धाय मोकलून रडत होते. नवजात बालकांचा काय दोष? माणूसकी असलेला कोणताही व्यक्ती संवेदनशीलतेने हे पाहू शकत नाही. जे कुटुंब उद्धवस्त झालं त्यांना सरकारने आतातरी माणूसकी दाखवत प्रत्येकी १० लाखांनी आर्थिक मदत तातडीने द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांना देखील लक्ष्य केलं. ते म्हणाले की, भाजप चाणक्यला आमदारा पुरवायला, गोळा करायला फोडायला वेळ मिळतो. पण, इथे शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्रणा भरती करायला वेळ नाही, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. वडेट्टीवार यांनी रुग्णालयाला भेट दिल्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात रुग्णांचे नातेवाईक धाय मोकलून रडताना दिसून येत आहेत.