आता नेत्यांमध्ये जुंपली! दहशतवाद्यांना धर्म विचारण्याएवढा वेळ मिळाला का - वडेट्टीवार; पाकिस्तानला क्लीनचिट देण्याची स्पर्धा सुरू आहे - भाजप

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून सोमवारी वाद निर्माण झाला आहे.
विजय वडेट्टीवार, चंद्रशेखर बावनकुळे (डावीकडून)
विजय वडेट्टीवार, चंद्रशेखर बावनकुळे (डावीकडून)
Published on

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून सोमवारी वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाने काँग्रेस नेत्यावर टीका केली असून पक्षाचे जुने नेते पाकिस्तानला क्लीनचिट देण्याची स्पर्धा सुरू आहे, असा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे.

काँग्रेस नेते एकामागून एक पाकिस्तानला क्लीनचिट देण्यासाठी स्पर्धा करत आहेत. आता विजय वडेट्टीवार म्हणतात, की सरकार जबाबदार आहे. पाकिस्तान जबाबदार नाही आणि दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारे लोकांची हत्या केली याचा काही पुरावा आहे का, असे भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटले आहे.

हे पहिल्यांदाच सांगितले जात नाही. राष्ट्रवादी-शरद पवार गटाचे अनिल देशमुख यांच्याकडूनही हेच बोलले आहे. सर्वपक्षीय बैठकीत ते म्हणतील, की पाकिस्तान जबाबदार आहे. पाकिस्तानवर कारवाई करा, दहशतवाद्यांवर कारवाई करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि सर्वपक्षीय बैठकीनंतर ते म्हणतात की, पाकिस्तानवर कारवाई करू नका, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.

'भारत युद्धाच्या बाजूने नाही' या कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर वक्तव्याबद्दल भाजपने टीका केली आहे.

घटनेत सुरक्षेत त्रुटी आढळून आल्या आहेत. काश्मीर प्रदेशात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने सुरक्षा वाढवावी, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले होते.

भाजप खासदार संबित पात्रा म्हणाले, आज सिद्धरामय्या यांचे शब्द पाकिस्तानातील माध्यमांमधून प्रसारित होत आहेत. त्यांच्यासोबत उभे असलेले हे प्रमुख काँग्रेस नेते पहा. असेच आणखी एक नेते कर्नाटकचे उत्पादन शुल्क मंत्री रामप्पा तिम्मापूर आहेत ज्यांनी असेही म्हटले आहे की दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारे गोळीबार केला नाही. ते दहशतवाद्यांशी सहानुभूती दाखवण्यासाठी भारतीयांना खोटे सांगत आहेत आणि शोकाकुल कुटुंबांची थट्टा करत आहेत.

काय म्हणाले वडेट्टीवार?

आम्हालाही सांगितले जात आहे की, दहशतवाद्यांनी धर्म निश्चित केला आणि नंतर लोकांना मारले. दहशतवाद्यांना एखाद्याच्या जवळ जाऊन कानात कुजबुजण्यासाठी इतका वेळ आहे का? हे अत्यंत वादग्रस्त आहे. कारण काहीजण अशा गोष्टी घडल्याचा दावा करत आहेत तर काही जण ते नाकारत आहेत. त्याभोवती काहीही योजना आखू नका. दहशतवाद्यांना जात किंवा धर्म नसतो. दहशतवादी हल्ल्याच्या मूळ मुद्द्यावरून आणि त्यामागील कारणांवरून लक्ष विचलित करणे चुकीचे आहे. आम्हाला वाटते की असे हल्ले देशावर होत आहेत आणि त्यांना योग्य उत्तर दिले पाहिजे. सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घ्यावी. मुळात दहशतवादी आले आणि त्यांनी आपल्या लोकांना मारले. जर त्यांनी लोकांना मारण्यापूर्वी धर्म निश्चित केला असेल तर त्यांनी देश अस्थिर करण्याच्या उद्देशाने ते केले. त्यांचे उद्दिष्ट भारतातील दोन प्रमुख समुदायांमध्ये संघर्ष सुरू करणे आणि शेवटी मोठे नुकसान करणे आहे. दहशतवाद्यांनी कलमा म्हणण्याचा आग्रह धरणे ही प्रत्यक्षात भारताचे नुकसान करण्यासाठी पाकिस्तानची रणनीती आहे. कोणालाही देश अस्थिर करण्याची परवानगी देऊ नये.

विरोधकांनी सरकारबरोबर राहावे - आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे की, विरोधकांनी आमच्यासोबत उभे राहिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला गरज पडल्यास देशासोबत उभे राहण्याचे हेच शिकवले, असे ते म्हणाले. कलम ३७० रद्द केल्यानंतर पर्यटक मोठ्या संख्येने काश्मीरला भेट देऊ लागले. जम्मू-काश्मीर निवडणुकीत मतदानाचे प्रमाण ६० टक्के होते. दहशतवादी आणि पाकिस्तान या घडामोडींमुळे खूश नव्हते. भारत अधिक मजबूत होत आहे आणि मुस्लिमांसह जम्मू-काश्मीरचे लोक देशासोबत आहेत, असे ते म्हणाले.

राष्ट्रविरोधी मानसिकतेचे दर्शन - बावनकुळे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. दहशतवाद्यांना जात किंवा धर्म नसतो असे विधान वडेट्टीवार यांनी केल्याबद्दल बावनकुळे यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये वडेट्टीवार यांच्या विधानाला "असंवेदनशीलतेची पराकाष्ठा" म्हटले आहे. त्यांचे विधान "राष्ट्रविरोधी मानसिकता" दर्शवते, असेही म्हटले आहे. काश्मीरमध्ये हिंदूंना लक्ष्य केले जाते हे वारंवार सिद्ध झाले आहे. विजय वडेट्टीवार कोणत्या जगात राहत आहेत? दहशतवाद्यांना जात किंवा धर्म नसतो असा दावा करून वडेट्टीवार कोणाला खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in