

जव्हार : एसआयआर (विशेष सखोल पुनरीक्षण) मोहिमेंतर्गत विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक विभागाने सोमवारी (दि. ३१) मतदारांची प्रारुप यादी प्रसिद्ध केली. एसआयआर २०२६ लागू होण्यापूर्वी मतदारसंघात ३ लाख १५ हजार ७२९ मतदार होते. त्यापैकी २६ हजार ६५८ मतदार वगळण्यात आल्याने आता मतदारसंख्या २ लाख ८९ हजार ७१ झाली आहे, अशी माहिती निवडणूक नायब तहसीलदार वसंत सांगळे यांनी दिली.
एसआयआर मोहिमेंतर्गत ३० जून ते १८ ऑगस्टदरम्यान विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील ३७१ मतदान केंद्रांवर मतदारांची पडताळणी करण्यात आली. यासाठी मतदार नोंदणी अधिकारी व १५ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, तसेच मतदान केंद्रनिहाय केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. बीएलओंनी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचे वितरण व संकलन केले. त्यानंतर अर्जांचे डिजिटलायझेशन करून मतदारांची माहिती पडताळण्यात आली.
पडताळणीदरम्यान पत्त्यावर न सापडलेले, कायमस्वरूपी स्थलांतरित, मृत तसेच दुबार मतदारांच्या नोंदी तपासण्यात आल्या. त्यानुसार १० हजार ७५९ मयत मतदार, ७४३ पत्त्यावर न आढळलेले मतदार, ११ हजार ५२३ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, ३ हजार ४९१ दुबार मतदार आणि १४२ इतर नोंदी वगळण्यात आल्या आहेत.
विक्रमगड विधानसभा मतदारसंघात जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यांसह वाडा तालुक्यातील काही भागाचा समावेश आहे. विविध कारणांमुळे मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या; मात्र मतदारसंघात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना पुन्हा नावनोंदणीची संधी देण्यात आली आहे. दरम्यान, वगळलेल्या मतदारांसह मतदार यादीबाबत इतर दावे व हरकती नोंदवण्यासाठी १ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत अधिकाऱ्यांकडे अर्ज करता येणार आहे.
असे वगळले मतदार
एकूण मतदान केंद्रे : ३७१
एसआयआर अंतर्गत डिजिटल झालेली मतदार संख्या : २ लाख ८९ हजार ७१
आढळून आलेले मयत मतदार : १०,७५९
पत्त्यावर न आढळलेले मतदार : ७४३
कायमस्वरूपी स्थलांतरित
मतदार : ११,५२३
दुबार मतदार : ३,४९१
इतर : १४२
एकूण वगळलेले मतदार : २६,६५८
एसआयआर मोहिमेत मतदाराचे नाव, पत्ता, छायाचित्र तसेच नोंदविलेल्या माहितीतील विसंगती आणि इतर तपशिलांची पडताळणी करण्यात आली. याशिवाय अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांच्या नोंदींची तपासणी करून प्रारुप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.
डॉ. अपूर्वा बासुर मतदार नोंदणी अधिकारी