
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले होते. त्यांचे पार्थिव रात्री उशिरा बीडमध्ये आणल्यानंतर शिवसंग्राम भवन येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर सोमवारी दुपारी मेटे यांच्या पार्थिवावर बीड येथील उत्तमनगरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते प्रवीण दरेकर यांसह राजकीय क्षेत्रातील अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
अंत्ययात्रेला सुरुवात झाल्यानंतर कार्यकर्ते आणि नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बशीरगंज, बलभीम चौक, माळीवेस, सुभाष रोड, शाहूनगरमार्गे त्यांची अंत्ययात्रा कॅनॉल रोडवरील रामदेव बाबा मैदानामार्गे अंत्यसंस्कारस्थळी गेली. रिलायन्स पेट्रोल पंपमागील उत्तमनगर येथे विनायक मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.