
मुंबई : २०१९ मध्ये न्यायालयाने निकाल देत प्रकरण निकाली काढले. मात्र ७ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रकरण उखडून काढत नाहक बदनामी करण्याचे कटकारस्थान रचले गेले. व्हिडीओ क्लिप वायरल करत माझी, माझ्या कुटुंबीयांची व माझे राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले गेले. त्यामुळे खासदार संजय राऊत, विधानसभा सदस्य रोहित पवार आणि खासगी यूट्यूब चॅनेल विरोधात हक्कभंग प्रस्ताव ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे मांडला. दरम्यान, गोरे यांनी मांडलेला हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी हक्कभंग समितीकडे पाठवण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
एखाद्या प्रकरणात न्यायालयाने निकाल देत दोषमुक्त केले आहे. तरीही राजकारणासाठी जुने व्हिडीओ वायरल करण्यात आले. व्हिडीओ वायरल केल्याने माझी, माझ्या कुटुंबीयांची व माझे राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर नाहक बदनामी केली असून हा सभागृहाचा अवमान आहे. त्यामुळे मला टीकेचा सामना करावा लागला. तर विधानसभा सदस्य रोहित पवार यांनीही सभागृहात मुद्दा उपस्थित न करता सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांना माहिती देत माझी बदनामी केली, तर यूट्यूब चॅनलवर सतत व्हिडीओ व्हायरल करत बदनामी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा नियम २७३, २७४ अन्वये संजय राऊत, रोहित पवार आणि यूट्यूब चॅनेलच्या संपादकाविरोधात हक्कभंग प्रस्ताव गोरे यांनी मांडला.