सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग

कोणताही पुरावा नसताना आपल्यावर आरोप करण्यात आले आहेत. गेल्या ३० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत आपण सातत्याने ड्रग्ज माफियांच्या विरोधात लढा देत आहोत.
सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग

नागपूर : निनावी पत्राच्या आधारे पुण्यात पत्रकार परिषद घेऊन बदनामी केल्याचा आरोप करत भाजपच्या नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंगाची सूचना मांडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तात्काळ ही सूचना स्वीकारली नाही. मात्र, सूचना तपासून निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. सुषमा अंधारे यांनी त्यांना मिळालेल्या निनावी पत्राच्या आधारे फरांदे यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या फरांदे यांनी हक्कभंगाची सूचना मांडण्याचा प्रयत्न केला.

ललित पाटील यांच्या प्रकरणात आपल्यावर झालेले आरोप खोटे आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आपण पोलीस आयुक्त तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ड्रग्ज माफियांविरोधात ३० वर्षे लढा : फरांदे

कोणताही पुरावा नसताना आपल्यावर आरोप करण्यात आले आहेत. गेल्या ३० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत आपण सातत्याने ड्रग्ज माफियांच्या विरोधात लढा देत आहोत. ड्रग्ज माफिया, पेडलर्स यांचे नंबर आपण गृहखात्याला देऊन चौकशीची मागणी केली. त्यानंतरच नाशिक, सोलापूर येथील ड्रग्जचे कारखाने उघडकीस आले, असे फरांदे म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in