राज्यात मराठा आरक्षण आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण आंदोलन सुरू केलं असताना दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना वारंवार घडत आहेत. आदोलकांनी हिंसक रूप धारण केलं आहे . बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करून आवारातील वाहनांना आग लावण्याची घटना समोर आली आहे.
त्यानंतर आता बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय 'राष्ट्रवादी भवन' देखील पेटवून दिल असल्याची धक्क्यादायक घटना समोर आली आहे. याशिवाय , राज्यातील मराठा आंदोलकांनी राजकीय पक्षांशी संबंधित हॉटेल, संस्थांच्या कार्यलयाच्या जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बीडमध्ये संतप्त मराठा आदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या राहत्या बंगल्याला आग लावली आहे. बीडमध्ये सुरू असलेल्या 'या' जाळपोळीच्या घटनांमुळे बीडमध्ये अधिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याआधी मराठा आंदोलकांच्या जमावाने क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या केएसके कॉलेजच्या संस्था कार्यालयाला देखील आग लावली आहे.
धुळे-सोलापूर हायवेवर बीड शहरानजीक असलेल्या 'हॉटेल सनराइज'ला संतप्त जमावान आग लावली आहे. समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांच्या मालकीचे हॉटेल आहे. बीड शहरातील सुभाष रोड या मुख्य बाजारपेठेत जमावाने दगडफेक केल्यानंतर बीड शहरातील सगळी बाजारपेठ बंद करण्यात आली आहेत. यावेळी सुभाष रोडवर लावलेल्या दोन मोटरसायकल देखील जमावांननी पेटवून दिली आहे.