
बीड : बीडमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ खोक्या भाईला तुरुंगात ‘व्हीआयपी ट्रिटमेंट’ देणे पोलिसांच्या अंगाशी आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी छाकलंबा पोलीस ठाण्यातील विनोद सुरवसे आणि कैलास खटाणे या दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन केले. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी ही कारवाई केली.
खोक्याला वन्यजीवांची शिकार आणि दोन व्यक्तींना मारहाण केल्याप्रकरणी अटक झाली आहे. बीड पोलिसांकडून खोक्याची शाही बडदास्त राखली जात असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोमवारी दुपारी काढण्यात आल्याचे सांगितले जाते. वाल्मिक कराड पाठोपाठ खोक्याला बीड पोलिसांकडून शाही वागणूक दिली जात असल्याने पोलीस दलाबाबत पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी दोषी असल्यास त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. तसेच ठाणेदारांना याप्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.
खोक्याला शिरूर न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोठडी सुनावल्यानंतर कारागृहात जाण्यापूर्वीच त्याला ‘व्हीआयपी ट्रिटमेंट’ मिळत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुख्यात आरोपीची पोलिसांकडून शाही बडदास्त का आणि कशासाठी ठेवली जात आहे, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
बिर्याणीचा सुग्रास बेत
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत बीड पोलिसांनी खोक्याला तुरुंगाबाहेर आणले होते. पोलिसांनी त्याला तुरुंगाबाहेर काढून त्याच्या जेवणासाठी बिर्याणीचा सुग्रास बेत आखला. तसेच तो यावेळी बिनधास्तपणे मोबाइलवर बोलताना दिसत आहे. व्हिडीओत सतीश भोसले हा एखाद्या व्हीआयपी व्यक्तीच्या थाटात पोलिसांच्या कोंडाळ्यात उभा असल्याचे दिसत असून खोक्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक त्याला बिनधास्तपणे भेटताना दिसत आहेत. या भेटीगाठीसाठी न्यायालयाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच तो त्याच्या कार्यकर्त्यांना भेटताना दिसत होता.