
मुंबई : मुंबईसह एमएमआर रिजनमधील वाहतूककोंडी फोडण्यासाठी विरार-अलिबाग मल्टी कॉरिडॉर प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २२ हजार २५० कोटी रुपये कर्जास मंजुरी दिली आहे. त्यामुळे विरार अलिबाग मल्टी कॉरिडॉर प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे.
विरार ते अलिबाग वाहतूक मार्गिका या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हुडको या वित्तीय संस्थेकडून उभारण्यात येणाऱ्या २२ हजार २५० कोटीच्या कर्जास वित्त विभागाच्या अटीस अधीन राहून शासन हमी देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने २६ जून २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मंजूरी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मागणीनुसार हुडकोकडून प्रस्तावित व्याजाचा दर कर्ज घेण्याच्या वास्तविक दिनांकावर अवलंबून असणार आहे. कर्ज घेताना रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित बँक दराचा विचार करून, त्यानुसार व्याजाचा दर कमीत कमी निश्चित करण्याबाबतची कार्यवाही करावी. कर्जाचा मुदत कालावधी १५ वर्षाचा असणार आहे. विधी व न्याय विभागाने विहित केलेल्या नमुन्यात शासन हमी करारनामा करण्यात यावा, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या आर्थिक स्थितीचा अहवाल दर ६ महिन्यांनी (३१ मार्च व ३० सप्टेंबर) सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करणे बंधनकारक असणार आहे.
मुंबई-रायगड एक तासात
मुंबई-विरार-अलिबाग-अटल सेतूवरून पुन्हा मुंबईत मरीन ड्राइव्ह ते वरळी, वरळी सी लिंक ते वर्सोवा-दहिसर आणि दहिसर ते भाईंदर आणि भाईंदर ते विरार आणि विरारपासून पालघर ते थेट अलिबागपर्यंत रिंग रोंड तयार करण्यात येणार आहे. अलिबागला हा मार्ग अटल सेतूला जोडला जाईल. यामुळे मुंबई आणि महानगर क्षेत्र एका मार्गाने जोडले जाणार आहे. यामुळे मुंबई ते रायगड एक तासात प्रवास करता येणार आहे.