विशाल अग्रवालला पोलीस कोठडी; अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द, ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश

पुण्यातील कल्याणीनगर भागात शनिवारी मध्यरात्री बेदरकारपणे पोर्श ही आलिशान गाडी चालवून दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात शनिवारी (दि. १९ मे) मध्यरात्री बेदरकारपणे पोर्श ही आलिशान गाडी चालवून दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना पुणे सत्र न्यायालयाने २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन पुणे बाल न्याय मंडळाने रद्द केला असून त्याला ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात निरीक्षणाखाली ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शनिवारी १९ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन करून पोर्श या चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिली. या धडकेत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया हे जोडपे जागीच मृत पावले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अल्पवयीन मुलाच्या हाती गाडी दिल्यामुळे त्याच्या वडिलांना पोलिसांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. त्यांना बुधवारी पुणे सत्र न्यायालयात कडेकोट बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. या सुनावणीत न्यायालयाने विशाल अग्रवाल याच्यासह बारमालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांनासुद्धा पोलीस कोठडी सुनावली आहे.

विशाल अग्रवाल याला न्यायालयात आणल्यानंतर ‘वंदे मातरम’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपीच्या तोंडावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवले. दरम्यान, कार्यकर्ते शाईफेक करू शकले नसले तरी त्यांनी पोलिसांच्या वाहनासमोर उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली. आरोपीला मोक्का कायद्याअंतर्गत अटक केली पाहिजे, अशी मागणी ‘वंदे मातरम’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. आम्ही या बिल्डरला धडा शिकवायला इथे आलो होतो. परंतु, पोलिसांमुळे तो बचावला.

त्याच्यावर हल्ला करण्याचे आमचे उद्दिष्ट होते. आम्ही त्याचे तोंड काळे करायला इथे आलो होतो. कारण त्याच्या मुलाने दोन निष्पाप जीव घेतले आहेत. त्या मुलांचे आई-वडील आता त्यांच्या लेकरांना पाहू शकणार नाहीत. त्यामुळे या आरोपीचे तोंड काळे करून समाजाला दाखवायचे होते. तसेच त्याच्यावर मोक्का या कायद्याअंतर्गत कारवाई करा, अशी आमची मागणी आहे.

logo
marathi.freepressjournal.in