विशाळगड प्रकरणात काँग्रेस आक्रमक; शाहू महाराजांच्या भूमीत त्यांच्या विचारांना काळीमा फासण्याचा प्रयत्न: नसीम खान

विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा कोल्हापूरपर्यंत मर्यादित न राहता आता राज्यात याचे पडसाद उमटू लागले आहेत.
विशाळगड प्रकरणात काँग्रेस आक्रमक; शाहू महाराजांच्या भूमीत त्यांच्या विचारांना काळीमा फासण्याचा प्रयत्न: नसीम खान
Published on

मुंबई : विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा कोल्हापूरपर्यंत मर्यादित न राहता आता राज्यात याचे पडसाद उमटू लागले आहेत. विशाळगड प्रकरणात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांना केली आहे.

दरम्यान, विशाळगड दंगल प्रकरणी माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात आमदार भाई जगताप, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी आमदार युसुफ अब्राहनी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा, प्रवक्ते निजामुद्दीन राईन, भरत सिंह भरतसिंह होते. दरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे, विशाळगडावरील घटनेने शाहू महाराजांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम काही लोकांनी केले आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली ४० ते ५० कुटुंबावर हल्ला करण्यात आला. या घटनेने राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेला आळा घालता आला असता पण तसे प्रयत्न केल्याचे दिसत नाही. महाराष्ट्रात झुंडशाहीच्या बळावर दंगली घडवण्याचे हे कारस्थान दिसत आहे. राज्यात यापूर्वीही सामाजिक शांतता बिघडावी यासाठी दोन जाती धर्मात दंगली घडवण्याचे प्रयत्न झाले आहेत, यातून काही बोध घेतल्याचे दिसत नाही. विशाळगडाखालील गजापूर गावातील या घटनेत ज्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही नसीम खान यांनी केली आहे.

पोलिसांचे खच्चीकरण झाले तर जनतेने कोणाकडे बघायचे - अस्लम शेख

छत्रपती शिवाजी महाराजांपासून सबंध जग प्रेरणा घेतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन राज्यकारभार केला; मात्र आज त्याच शिवरायांच्या भूमीत महिलांवर अत्याचार होत आहेत. पोलीसांना मारहाण होत आहे. जर पोलीसांचं खच्चीकरण झालं तर जनतेने कोणाकडे अपेक्षेने बघायचं..? असा सवाल काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी उपस्थित केला. दरम्यान, अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांची भेट घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी आमदार अमिन पटेल उपस्थित होते.

व्याजासह हिशोब द्यावा लागेल!

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत. त्यामुळे येथे एकही अनधिकृत बांधकाम केले जाऊ देणार नाही. ही औरंगजेब किंवा अफजलखानाची भूमी नाही, ही आमच्या महाराजांची भूमी आहे. ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे, त्यांना व्याजासकट संपूर्ण हिशोब द्यावा लागेल, असे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.

जबाबबदार नेत्यांनी एकत्र येऊन जातीय सलोखा ठेवावा

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या शिवकल्याणकारी महाराष्‍ट्रामध्‍ये सध्‍या जाती-जातींमध्‍ये द्वेषाचे विष कालवून जातीय सलोखा धोक्‍यात आणण्‍याचे प्रयत्‍न सुरू आहेत. विविध विचारसरणीचे आणि त्‍यातही नव्‍याने पुढे आलेले काही नेते किरकोळ राजकीय फायदा नजरेसमोर ठेऊन दुहीचे आणि द्वेषाचे विष कालविण्‍याचे पाप करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रात ऐतिहासिक काळापासून जातीय सलोख्याचे वातावरण आहे आणि गावा-गावांमध्‍ये लोक गुण्‍यागोविंद्याने नांदतात. या वातावरणाला नख लावण्‍याचे प्रयत्‍न हाणून पाडले पाहिजेत. सर्व जबाबबदार राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्‍ट्रातील जातीय सलोखा कायम रहावा यासाठी प्रयत्‍न करावेत, असे आवाहन भाजप खासदार नारायण राणे यांनी एक्सवर केले आहे.

विशाळगड आणि परिसरात शांतता राखावी - छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमणविरोधी मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. कारण जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली आणि मालमत्तेचे नुकसान केले, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २१ जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, महाविकास आघाडीचे सतेज पाटील आणि छत्रपती शाहू महाराज यांनी मंगळवारी भेट दिली. यावेळी विशाळगड आणि परिसरात शांतता राखावी, असे आवाहन छत्रपती शाहू महाराज यांनी केले आहे.

अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील - फडणवीस

विशाळगडावरील अतिक्रमणाचा प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवण्यात येईल. यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. विशाळगडासह महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याबाबत सरकार अँक्शन प्लॅन तयार करीत आहे. विशाळगडावरील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम हा जुना मुद्दा आहे, जो माजी राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे यांनी बेकायदा बांधकामांविरोधात मुद्दा पुन्हा उपस्थित केल्याचे फडणवीस म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in