

मुंबई : जगभरात विखुरलेल्या मराठी बांधवांना, उद्योजकांना आणि मराठी संस्कृतीला एका वैश्विक व्यासपीठावर आणण्यासाठी पुढील ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ लंडनमध्ये आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी लंडन येथे बोलताना केली. याशिवाय जगभरातील मराठी भाषकांसाठी एक मध्यवर्ती संस्था स्थापन करण्याबाबतही विचार सुरु असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
लंडन येथील ऐतिहासिक अशा महाराष्ट्र मंडळाने शिंदे यांचा 'ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र' हा पुरस्कार देऊन सन्मान केला. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्र्यांचा हा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना शिंदे यांनी विश्व मराठी साहित्य संमेलनाची घोषणा केली. सातासमुद्रापलीकडे मराठी माणसाने झेंडा फडकवला आहे. त्यामुळे महाराष्ट्र मंडळाच्या पाठीशी राज्य सरकार आणि एकनाथ शिंदे म्हणून मी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी दिला.
महाराष्ट्र भवनात आयोजित कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाली होती. तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि मराठी परंपरेनुसार शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी 'जय महाराष्ट्र, जय भवानी-जय शिवाजी' च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी लंडनस्थित सर्व मराठी जनाला गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी तो आपली माती, भाषा आणि संस्कृती कधीही विसरत नाही. नुकताच मराठी भाषेला केंद्र सरकारकडून 'अभिजात भाषेचा' दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेचा हा डंका जगभरात गाजवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर मराठी माणसांना मजबूतपणे जोडण्यासाठी लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन भरवले जाईल, असे शिंदे म्हणाले.यावेळी निवृत्त सनदी अधिकारी भूषण गगराणी, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, महाराष्ट्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉ. गोविंद कानेगावकर, मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके, मराठी भाषा संचालक श्यामकांत देवरे, मराठी चित्रपट निर्माते अभिनेते मंगेश देसाई त्याचप्रमाणे इतर मान्यवरांची उपस्थिती होती.