विश्वजित कदम नेमके कोणत्या पाटलांच्या मागे? ४ जूननंतर होणार स्पष्ट

सांगलीतील कॉंग्रेस नेते तथा माजी मंत्री विश्वजित कदम यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून जीवाचे रान केले
विश्वजित कदम नेमके कोणत्या पाटलांच्या मागे?  ४ जूननंतर होणार स्पष्ट

विशेष प्रतिनिधी/मुंबई :

सांगलीतील कॉंग्रेस नेते तथा माजी मंत्री विश्वजित कदम यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून जीवाचे रान केले. मात्र, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेच्या जागेसाठी आग्रही भूमिका घेऊन उमेदवार परस्पर जाहीर केला. त्यामुळे महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला. त्यावरून शेवटपर्यंत वाद सुरू होता. परंतु अखेरच्या टप्प्यात आघाडीचा धर्म म्हणून विश्वजित कदम यांनी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार केला. परंतु ते नेमके कोणत्या पाटलांसोबत याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. याबाबत बोलताना त्यांनी मी कायम पाटलांसोबत आहे. परंतु नेमके कोणत्या पाटलांसोबत आहे, हे ४ जूननंतर स्पष्ट होईल, असे सांगत पुन्हा त्यांच्या भूमिकेचे गूढ वाढविले. यावरून आता उलटसुलट चर्चा रंगली आहे. 

ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री विश्वजित कदम बोलत होते. ते म्हणाले की, पाटील आणि कदम यांचे नाते खूप जवळचे आणि चांगले आहे. कदम हे नेहमीच पाटील यांच्या मागे आहेत. परंतु नेमके कोणत्या पाटलांच्या मागे आहेत, हे ४ जूननंतर कळेल, असे म्हणताच एकच जल्लोष झाला. विश्वजित कदम यांनी कदाचित हे सहज जरी म्हटले असले तरी सांगलीत कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी केलेली धडपड, त्यानंतर विशाल पाटील यांची बंडखोरी आणि अपक्ष लढत, त्यात त्यांना वाढत गेलेला पाठिंबा आणि सतत नाराजी व्यक्त करीत असतानाच अखेरच्या क्षणी चंद्रहार पाटील यांच्यासोबत प्रचाराला उपस्थिती, हे सर्व पाहता या घडामोडीत विश्वजित कदम नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यात मतदान झाल्यानंतर त्यांनी जे वक्तव्य केले, त्यामुळे विश्वजित कदम नेमके कोणत्या पाटलांच्या मागे उभे राहिले, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. 

सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे संजयकाका पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे विशाल पाटील यांनी अगोदरपासूनच तयारी केली होती. उमेदवारी जाहीर होण्याअगोदरपासून ते प्रचारात होते. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाने आपल्याकडील कोल्हापूर मतदारसंघ कॉंग्रेसला सोडला. त्या बदल्यात त्यांनी सांगलीची मागणी केली. परंतु तेथे कॉंग्रेसचा उमेदवार असल्याने आणि सांगली कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्याने ही जागा कॉंग्रेस नेते सोडायला तयार नव्हते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी ही स्थिती पाहून परस्परच डबल केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करून टाकली. त्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली. शेवटपर्यंत कॉंग्रेस नेत्यांनी ही जागा सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ठाकरेंनी ही जागा सोडली नाही. त्यामुळे टोकाचे मतभेद झाले. परंतु अखेर थेट दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनीच विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु विश्वजित कदम एक पाऊल मागे घेतले. परंतु विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून लढत दिली. त्यांना चांगलाच पाठिंबा मिळाला. त्यामुळे यात विश्वजित कदम यांची नेमकी भूमिका काय, हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्यातच त्यांनीच वक्तव्य केल्याने पुन्हा त्यांच्या भूमिकेविषयी सस्पेन्स वाढला आहे.

केवळ आघाडीचा धर्म म्हणून...

माजी मंत्री विश्वजित कदम कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींवर नाराज होते. त्यांनी दिल्लीच्या वाऱ्या करून आपली भूमिकाही मांडली. परंतु पक्षश्रेष्ठी विशाल पाटील यांच्या मागे उभे राहिले नाहीत. त्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. त्यानंतर विश्वजित कदम महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात उतरले. परंतु त्यांचे मन प्रचारात रमत नव्हते. हे त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून लक्षात येत होते. त्यामुळे ते केवळ आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून तर हजेरी लावत नव्हते ना, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in