साखर उद्योगाला दिशा देणारा दूरदर्शी शास्त्रज्ञ : डॉ. डी. जी. हापसे सर

ऊस शेतकऱ्यांसाठी अविरत झटणारे, ऊस शेती, साखर व पुरक उद्योग यासाठी कल्पकता, प्रयोगशीलता, उद्योगशीलता याद्वारे ऊस पिकास उद्योगाचे स्वरूप देणारे एक थोर कृतिशील शास्त्रज्ञ म्हणून डॉ. हापसे सर यांची नोंद सुवर्ण अक्षरांनी ऊस शेतीच्या इतिहासात होईल यात तिळमात्र शंका नाही.
साखर उद्योगाला दिशा देणारा दूरदर्शी शास्त्रज्ञ : डॉ. डी. जी. हापसे सर
Published on

डॉ. हापसे सर यांच्या चौथ्या स्मृती दिनाच्या निमित्ताने

प्राध्यापक बी. बी. गुंजाळ

ऊस शेतकऱ्यांसाठी अविरत झटणारे, ऊस शेती, साखर व पुरक उद्योग यासाठी कल्पकता, प्रयोगशीलता, उद्योगशीलता याद्वारे ऊस पिकास उद्योगाचे स्वरूप देणारे एक थोर कृतिशील शास्त्रज्ञ म्हणून डॉ. हापसे सर यांची नोंद सुवर्ण अक्षरांनी ऊस शेतीच्या इतिहासात होईल यात तिळमात्र शंका नाही. त्यांच्या आयुष्याचा जीवनपट म्हणजे ऊस शेतीच्या व साखर उद्योगाच्या विकासाचा जीवनपट असे म्हटले तर वावगे होणार नाही.

ऊस शेतकऱ्यांचा आधारवड

सन १९७५ ते २०२१या कालखंडात ऊस शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले महान कार्य कायम स्मरणात राहील यात शंका नाही. आज महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या ऊस शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत ग्रामीण भागात जी काही सुबत्ता दिसते ती केवळ ऊस व ऊस पिकांवर आधारित पीक पद्धती व त्यावर समृद्ध झालेली साखर व तत्सम पूरक कारखानदारी व त्यात मोलाचा सहभाग किंबहुना सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर डॉ. हापसे सरांच्या दूरदर्शी नियोजनाचा असे म्हटले तर वावगे होणार नाही .

वसंतदादा साखर संस्थेचे संचालक म्हणून मला भावलेले डॉ. हापसे व त्यांची चतुरस्त्र कामगिरी

मी वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट या ठिकाणी प्रोसेस इंजिनिअर (प्रक्रिया अभियंता ) म्हणून मे १९८७ मध्ये रुजू झालो. १९८७ ते १९९५ या सर्वसाधारण ८ वर्षाचे कालखंडात डॉ. हापसे सर संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत असतांना त्यांचे बहुमोल मार्गदर्शनाखाली मला सुरवातीस विभाग प्रमुख, कृषी अभियांत्रिकी विभाग व १९९० नंतर विभाग प्रमुख, अल्कोहोल टेक्नॉलॉजी व पर्यावरण विभाग या ठिकाणी काम करण्याची संधी लाभली. त्यांच्या त्या काळातील चतुरस्त्र कामगिरीचा प्रभाव माझ्यावर आजही कायम आहे. त्यांनी सर्व सहकार्यांना दिलेले प्रोत्साहन आजही माझ्या स्मरणात आहे. ते संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत असताना त्यांचे अधिपत्याखाली झालेल्या उल्लेखनीय कार्याचा गोषवारा पुढे देत आहे.

कृषितंत्रज्ञान विभागात डॉ. हापसे सरांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली झालेल्या कामाचा आढावा

१. जास्त उत्पादन व साखर उतारा देणाऱ्या जातींचा प्रचार व प्रसार

राज्यातील सहकारी साखर कारखानदारी शेतकरी सभासदांच्या मालकीची राहावी यासाठी तसेच त्यांना सुदिन आणावयाचे असतील तर उसाची प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविणे तसेच साखर उतारा प्रति माह, प्रति हेक्टरी ज्या वाणांचा जास्त आहे त्या वाणांना प्राधान्य देणे या बाबी त्यांच्या चाणाक्ष नजेरेतून सुटल्या नाहीत. यासाठी कृषीतंत्रज्ञान विभागातील प्रत्येक शास्त्रज्ञाने ३ ते ५ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांना लागवडी हंगामाचे अगोदर मार्गदर्शन करावयाचे असे ठरले. त्यानुसार लवकर परिपक्व होणाऱ्या व जास्तीत जास्त साखर उतारा असणाऱ्या, हंगामानुसार जातीनिहाय लागवड व तोडणीचा धडक कार्यक्रम सर्व सहकारी साखर कारखान्यावर अनेक वर्ष राबविण्यात आला. उसाच्या को. ७२१९ (संजीवनी), को. ७५२७, कोसी. ७७१, को. ४१९, को. ८०१४, को. ८६०३२ इत्यादी अनेक वाणांचे प्रात्यक्षिक कारखाना प्रक्षेत्रावर आयोजित करून तसेच अनेक शेतकरी मेळावे घेऊन प्रात्यक्षिके कार्यक्रम राबविण्यात आला. ऊस उत्पादन तंत्रज्ञान यात प्रामुख्याने मशागत पद्धती, दर्जेदार व निकोप बेणेसाठीं त्रिस्तरीय बेणे पद्धत, तीन डोळा लागवड पद्धती ऐवजी एक डोळा लागवड पद्धत, टिश्यू कल्चर रोपें संस्थेमार्फत पुरवठा, बायो फर्टीलाझर व कंपोस्ट खताचा वापर, सुक्ष्म सिंचन पद्धत व पट्टा पद्धतीचा वापर करून पाण्याची मोठी बचत करून एकरी किमान १०० टन उत्पादकता मिळविण्याचे तंत्रज्ञान, ठिबक सिंचन पद्धतीतून खताचा किमान वापर करत असताना कमाल कार्यक्षमता वापर, आंतर पिके, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण, खोडवा वाढ उत्पादन तंत्रज्ञान , जास्त साखर उतारा मिळविण्यासाठी ऊस लागवड हंगाम व उशिरा पक्व होणाऱ्या ऊस वाणांखाली क्षेत्राचे नियोजन यासाठी शेतकरी, उसविकास अधिकारी, फिल्ड सुपरवायझर याना वेळोवेळी प्रशिक्षण आयोजन इत्यादी अनेक उपक्रमांचा समावेश करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणजे १९९० च्या दशकात असलेला राज्याचा साखर उतारा १० टक्क्यावरून २००० चे दशकात तो सरासरी ११.५ टक्के इतका झाला. त्यामुळेच कारखाण्याच्या सभासद शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उसाला जास्त भाव देता आला हे येथे मुद्दाम नमूद करत आहे.

२. जमिनीची सुपीकता वृद्धिंगत करण्यासाठी राबविलेले विविध उपक्रम

ऊस उत्पादकता वाढवावयाची असेल तर जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक सुपीकता, आरोग्य व जैव विविधता वृद्धिगत करणे व ती सदोदित कायम राखणे यासाठी पुढील उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आले.

२.१ रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर कमी करून ऊस शेतात शेंद्रीय खताचे तथा जमिनीत सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढविण्यासाठी उसाचे पाचट न जाळता जमिनीत गाडून ते कुजविण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले .

२.२ जमिनीच्या माती परिक्षणासाठी प्रयोगशाळा

डॉ.हापसे सर व कृषीतंत्रज्ञान विभागातील इतर सहकारी ह्यांचे मार्गदर्शनानुसार बऱ्याच सहकारी साखर कारखान्यांनी त्यांच्या सभासद शेतकऱ्यांसाठी जमिनीचे माती परीक्षण करून खतांचे नियोजन करण्यासाठी कारखाना प्रक्षेत्रावर "माती परीक्षण प्रयोगशाळा" स्थापित करण्यासाठी प्रोत्साहित केले.

२.३ गांडूळखत निर्मिती

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रक्षेत्रावर पालापाचोळा, कृषी अवशेष तसेच शेणखत इत्यादी पासून उत्तम प्रतीचे गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरु करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पथदर्शक प्रकल्प म्हणून त्याकडे पाहणे , त्याशिवाय गांडूळखत निर्मिती साठी गांडूळ प्रजाती 'ना नफा ना तोटा' या तत्वानुसार पुरवठा करण्याचे काम हाती घेण्यात आले. हे तंत्रज्ञान हजारो शेतकऱ्यांनी आत्मसात केले . तसेच असे अनेक प्रकल्प साखर कारखाना प्रक्षेत्रावर उभारण्यास मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली.

२.४ जैवखत (बायो फर्टीलायझर) निर्मिती

ऊस व ऊस आधारित पिकांमध्ये जैविक खतांचा वापर वाढावा तसेच जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जैव खत निर्मिती करणारी प्रयोगशाळा तथा प्रकल्प संस्थेच्या प्रक्षेत्रावर १९९० चे दशकात उभारण्यात आली.त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने जैव खते ज्यात रायझोबियम, अझोस्पिरिलिम, ऍझोटोबॅक्टर, फॉस्फोबॅक्टरीया, अलगल जैव खते इत्यादी मोठ्या प्रमाणावर तयार करून साखर कारखान्यांना व त्यांचे सभासद शेतकऱ्यांना ' ना नफा ना तोटा ' या तत्वावर देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.अनेक कारखान्यांवर अशा प्रयोगशाळा उभारण्यास तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

३. जैविक किड नियंत्रण

सेंद्रिय शेतीचे महत्व लक्षात घेऊन व विषमुक्त शेतीचा अवलंब शेतकऱ्याने करावा या दृष्टीने संस्थेच्या प्रक्षेत्रावर जैवीक कीटक नियंत्रण करण्यासाठी प्रयोगशाळा 1990 चे दशकात उभारण्यात आली व त्या ठिकाणी विविध जैविक कीटकनाशकं निर्मिती उदाहरणार्थ बॅसिलस थुरीगीएन्सिस, ट्रायकोडर्मा, एंटॉमॉपॅथॉजनिक निमॅटोडस, सुडोमोनास फ्लुरोसन्स इत्यादी निर्माण करून कारखान्यांमार्फत शेतकर्याना देण्याचा उपक्रम हाती घेऊन मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आला.

४. उत्ति संवर्धन प्रयोगशाळा (टिश्यू कल्चर लॅब)

डॉ.हापसे सरांच्या ऊस शेती बाबतचा दूरदृष्टीचा उत्कृष्ट नमुना म्हणजे 1984 सालामधील आशिया खंडातील सर्वात मोठी व अद्ययावत उत्ति संवर्धन या प्रयोगशाळेची केलेली उभारणी व त्या माध्यमातून उसाची रोपे तयार करणे तसेच नवीन जाती कि ज्या जास्त उत्पादकता व साखर उतारा देतील. या प्रयोगशाळेतून मोठ्या प्रमाणावर (सुमारे 21 लाख) उसाची रोपे विविध राज्यातील साखर कारखान्यांना व त्यांचे शेतकरी सभासदांना पुरविण्यात आली. त्याशिवाय उत्ति संवर्धन तंत्रज्ञानाचे माध्यमातून केळी , डाळिंब इत्यादी पिकांसाठी रोपे तयार करण्याचे काम हाती घेऊन मोठ्या प्रमाणावर त्याचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले.

५. नायगांव प्रक्षेत्रावर साखळी बंधारे योजना

नायगाव प्रक्षेत्राखालील पूर्णतः टेकड्यांची नापीक जमीन (सर्वसाधारण ३०० एकर) सुरवातीस टप्प्याटप्प्याने सिंचनाखाली आणण्यासाठी धडक साखळी बंधारे योजना राबविण्यात आली. आठ साखळी बंधारे तयार करण्यात आले.नंतर उपासजलसिंचन पद्धतीचा तसेच ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून मांजरी, नायगाव,सुभाष फार्म तसेच नसरापूर येथील भाडे तत्वावर घेतलेले प्रक्षेत्र यावर उसाच्या विविध वाणांची लागण व त्या माध्यमातून त्रिस्तरीय ऊस बेणे मळा योजना कि जेणेकरून राज्यातील सर्व साखर कारखान्यांना अत्त्युत्तम प्रतीचे ऊस बेणे पुरवठा संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला.

६. उसासाठी सुक्ष्म सिंचन पद्धतीचे मूल्यमापन संशोधन प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील साखर कारखानदारी वाढीसाठी तसेच शेतकऱ्यांची ऊस उत्पादकता व किमान पाण्याचा वापर करून जास्तीत साखर उतारा मिळण्यासाठी ऊस शेतात सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब तसेच ऊसशेतीचे यांत्रिकीकरण करण्यासाठी डॉ.हापसे सरांचे संशोधनात्मक मोठे योगदान आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. उसासाठी पाण्याचा होणार वापर प्रचंड आहे. पाण्याची उपलब्धता राज्याच्या शेतीचा विचार करता फक्त १९ टक्के आहे. अशा परिस्थितीत उसासारख्या पिकावर जास्तीत जास्त पाण्याचा वापर करणे इतर पिकांचा विचार करता परवडणारे नाही. किमान पाण्याचा वापर करून उसाचे कमाल उत्पादन कसे काढता येईल हा विषय सर्वांच्या चिंतनाचा किंम्बहुना चिंतेचा विषय होता, आहे यात शंका असण्याचे काही कारण नाही. डॉ.हापसे सरांचे मार्गदर्शनानुसार संस्थेच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने भारत सरकारच्या कृषि व अन्न मंत्रालयाकडून "उसासाठी विविध सूक्ष्म सिंचन पद्धतीचे मूल्यमापन” असा एक संशोधनात्मक प्रकल्प मंजूर करून घेण्यात आला. साखर उताऱ्याच्या झोननुसार सात सहकारी कारखान्याच्या प्रक्षेत्रावर ड्रीप, बायवॉल, इनलाईन ड्रीपर, मिक्रोस्प्रिंक्लर अशा विविध सूक्ष्म सिंचन पद्धतीचा प्रथमतःराज्यातच नव्हे तर देशात अभ्यास करून सतत तीन वर्षे शास्त्रीय पद्धतीने त्यांचे मूल्यमापन केले असता पाण्याची बचत ४० ते ५० टक्के तर खतांच्या मात्रेत ३० टक्के बचत होत असल्याचे आढळून आले. आज राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊस शेतीसाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर (२.५ लाख हेक्टर उसाखालील क्षेत्र ) करताना दिसत आहे. हा या संशोधनाचा परिपाक आहे यात शंका नाही.सध्या ए आय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. त्याचा पायां डॉ.हापसे सर व त्यांचे सहकाऱ्यानी १९९० चे दशकात घातला होता असे म्हटले तर वावगे होणार नाही.

७. पट्टा पद्धत व आंतरपिके

ठिबक सिंचन पद्धत व मेकॅनिकल हार्वेस्टर चा वापर या दृष्टीने पट्टा पद्धत विकसित करण्यात आली. ऊस लागवड केल्यानंतर सुरवातीचे काळात विविध आंतरपिकांचा अंतर्भाव कि जेणेकरून ऊस लागवड खर्च कमी होऊन शेतकऱ्यास अधिकचे उत्पन्न मिळेल. आंतरपिकांमध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्या म्हणजे कोबी, मुळा, गाजर , बटाटा इत्यादी , कडधान्यांमध्ये वाटाणा,सोयाबीन, उडीद, हरभरा, तूर व इतर पिके म्हणजे लसूण, टोमॅटो,वांगी,सूर्यफूल इत्यादींचा समावेश होतो.

८. ऊस लागवड व ऊस तोडणी यंत्र विकसित करण्याविषयीचे संशोधन

ऊस लागवड यंत्र व ऊस तोडणी यंत्र हे महत्त्वकांशी संशोधनात्मक प्रकल्प कृषी अभियांत्रिकी विभागाने त्यांचे मार्गदर्शनाखाली १९९० च्या दशकात आरंभ केले. ऊस लागवड व ऊस तोडणीसाठी मोठ्या प्रमाणावर मजूर आवश्यकता लागते. अलीकडच्या काळात शेतकामासाठी मजूर मिळणे अवघड होऊन बसले आहे. जास्तीची मजुरी देऊन लोकांना काम द्यावयाचे म्हटले तर शेती खर्च वाढतो. त्याचा आर्थिक ताण शेतकऱयांवर पडतो.या बाबी लक्षात घेऊन डॉ.हापसे सरानी अशी सयंत्रे विकसित करण्याची जबाबदारी कृषी अभियांत्रिकी विभागास देण्यात आली. ऊस तोडणी यंत्र विकसित करण्यासाठी भारत सरकारच्या दुर्गापूर येथील सेंट्रल मेकॅनिकल रिसर्च इन्स्टिटयूट (सिएमआरआय) यांचेबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. ऊस लागवड व ऊस तोडणीसाठी उपयुक्त ठरेल अशा यंत्राच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात आले. त्यातूनच ऊस लागवड यंत्र व ऊस तोडणी यंत्र विकसित होण्यास मदत झाली व ऊस तोड मजूर टंचाईचा प्रश्न काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली.

इथेनॉल व पर्यावरण शास्त्र या विभागात डॉ.हापसे सरांचे मार्गदर्शनाखाली झालेल्या कामाचा गोषवारा

डॉ.हापसे सर संस्थेचे संचालक असतांना उपपदार्थ म्हणजे उसाचा रस व मळी तसेच धान्य यापासून इथेनॉल /अल्कोहोल व त्या आधारित रसायन निर्मिती आणि हे करत असतांना आसवानी आधुनिकरण व किमान सांडपाणी निर्मिती व झिरो लिक्विड डिस्चार्ज या दृष्टीने प्रेसमड पासून कंपोस्टिंग, स्पेंटवॉश पासून बायोगॅस तसेच इन्सिनरेशन इत्यादी तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देण्यात आला. पर्यावरण विषयक जटील प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पर्यावरण शास्त्र हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास डॉ.हापसे सर यांनी परवानगी दिली हे या ठिकाणी त्यांच्या दूरदृष्टीची कल्पना यावी या हेतूने मुद्दाम नमूद करत आहे.

साखर निर्मिती उद्योगाबाबत त्यांचे संबंधित विभागांना मार्गदर्शन

विविध प्रकारच्या शर्करा निर्मितीबरोबरच बगॅस पासून वाफ व त्यापासून उच्चं दाबाचे तंत्रज्ञान वापरून कोजनरेशन निर्मितीवर भर देण्यात आला. शर्करा प्रत सुधारण्यासाठी तसेच प्रक्रिया खर्च कमी करण्यासाठी डॉ.हापसे सरांच्या कालखंडात आटोमेशन वर विशेष भर देण्यात आला. त्यासाठी सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग इन्स्टिटयूट (सिरी), पिलानी येथील डॉ. आचार्य सर (सिरीचे निवृत्त संचालक) याना मानद प्राध्यापक म्हणून संस्थेच्या शुगर इलेक्ट्रॉनिक्स विभागात त्यांना घेण्यात येऊन त्याचे बहुमोल मार्गदर्शनाखाली आटोमेशन वर विशेष भर देण्यात आला. साखर प्रक्रिया तसेच इथेनॉल निर्मिती करत असताना पाण्याचा किमान वापर करण्याचे दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात आले.

शिक्षण व प्रशिक्षण बाबत कामगिरी

साखर व साखरपूरक उद्योगवाढीसाठी मनुष्यबळ विकास यावर डॉ.हापसे सर संस्थेचे संचालक असताना विशेष भर देण्यात आला. शर्करा निर्मिती, सह विद्युत निर्मिती, इथेनॉल व अल्कोहोल आधारित रसायन उद्योग निर्मिती व मद्य पेये/वाईन उद्योग, आटोमेशन तसेच पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाचा पुरस्कार करण्यासाठी अभ्यासक्रमांमध्ये काळाची गरज ओळखुन वेळोवेळी बदल करण्यात आले. कारखान्यांचे सभासद शेतकरी, कारखान्याचे तंत्रज्ञ/अधिकारी, ऑपरेटर्स इत्यादी साठी प्रशिक्षण वर्ग, कार्यशाळा, सेमिनार्स इत्यादींचे आयोजन सदोदित करण्यात आले. साखर व पूरक उद्योग वाढीसाठी त्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांमुळे राज्यातच नव्हे तर ऊस उत्पादन करणाऱ्या बहुतांशी राज्यातील ग्रामीण भागाचा कायापालट झाल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावल्याचे अभ्यासाअंती दिसून आले आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट मधून १९९५ साली निवृत्त झाल्यानंतर डॉ.हापसे सरानी ' ज्ञानशिल ' या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून २०२१ सालच्या ऑगस्ट महिन्याच्या २८ तारखेपर्यंत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत ऊस शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत राहिले. एकरी किमान १०० टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान विकसित करून अनेक कारखान्यांवर त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

डॉ.हापसे सरांच्या स्वभावाचे पैलू

सरांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ,प्रत्येकास समजून घेणारे, असे एक आदरणीय बहुआयामी व्यक्तिमत्व. वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट मध्ये संचालक म्हणून काम करत असताना त्यांनी शास्त्रद्ज्ञानची उत्तम टीम तयार केल्याचे दिसून आले.सर संस्थेचे संचालक असताना सुद्धा स्वतःच महिन्याचे किमान २० दिवस साखर कारखाना स्थळांवर मार्गदर्शन करण्यासाठी जायचे. अश्या परिस्थितीत त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या अडचणींवर त्यांच्या कामावर बारकाईने लक्ष असायचे. साधी राहणी, परंतु कार्याला नेहमीच समर्पित असणारे सर माझ्यावर प्रभाव पाडून गेलेले एक संस्मरणीय व्यक्तिमत्व म्हणावे लागेल. संस्थेतून निवृत्त झाल्यावर त्यांच्या ऑफिसच्या ठिकाणी तसेच घरी जाण्याचा अनेक वेळा योग आला. त्यांच्या प्रमाणेच श्रीमती शिलाताई तसेच त्यांच्या सुविद्य मुलींचे प्रेमळ व आदरातिथ्य स्वभाव अनुभवायास आले.

अश्या या उद्यमशील, ऊस शेती/साखर व तत्सम पूरक उद्योगाच्या कक्षा रुंदावणारे , साखर उद्योगाशी निगडित नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारे , सामाजिक बांधिलकी जोपासणारे, नेहमीच शेतकऱ्यांचा कैवारी/आधारस्तंभ राहिलेले अश्या या कर्मयोगीची तथा प्रेरणादायी महान शास्त्रज्ञाची प्राणज्योत २८ आगस्ट २०२१ रोजी मालवली. त्यांना या निमित्ताने भावपूर्ण आदरांजली वाहतो, नमन करतो.

logo
marathi.freepressjournal.in