

सोलापूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास तसेच श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे हा परिसर उजळून निघाला आहे.
आषाढी यात्रेसाठी राज्यासह देशभरातून लाखो वारकरी व भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होत आहेत. दिवस-रात्र अखंड सुरू असलेल्या दर्शन व्यवस्थेबरोबरच मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत सजावट भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. सूर्यास्तानंतर संपूर्ण परिसर विविधरंगी प्रकाशाने उजळून निघत आहे. सध्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जतन व संवर्धनाचे काम प्रगतिपथावर असून या कामामुळे मंदिराला मूळ स्थापत्य वैभव प्राप्त होत आहे.
अलौकिक दृश्य
प्राचीन वास्तुशैलीचे सौंदर्य अधिक ठळकपणे समोर येत असतानाच त्यावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई मंदिराच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वैभवात अधिक भर घालत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील कळसावर करण्यात आलेली सजावट विशेष लक्ष वेधून घेत आहे. कळसदर्शनासाठी येणारे अनेक वारकरी व भाविक या अलौकिक दृश्याचे छायाचित्रण करून या अविस्मरणीय क्षणांची आठवण जतन करत आहेत. रोषणाईसाठी एलईडी माळा, रोपलाईट, लटकन, तोरणे, फोकस लाइट्स, डेकोरेटिव्ह लाइट आर्टिकल्सचा वापर करण्यात आला आहे.
२४ तास देखरेख
प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत २४ तास देखरेख ठेवण्यात येत आहे. ही आकर्षक विद्युत रोषणाई मंदिरे समितीमार्फत करण्यात आली असून संपूर्ण नियोजन व अंमलबजावणीची जबाबदारी विद्युत विभागप्रमुख राजेश तेलतुंबडे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.