राज्यातील शाळांमध्ये आता व्यावसायिक शिक्षण ; शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

लहान वयातच मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या संकल्पनेचे निरंजन हिरानंदानी यांनी कौतुक केले
राज्यातील शाळांमध्ये आता व्यावसायिक शिक्षण ; शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

राज्यभरातील शाळांमध्ये आता लवकरच व्यावसायिक शिक्षण प्रदान केले जाणार आहे. सहावीनंतरच्या विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. सेंट रेगिस हॉटेलमध्ये सोमवारी रंगलेल्या फ्री प्रेस जर्नलच्या स्कूल सर्व्हे पुरस्कार सोहळ्यादरम्यान शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतची माहिती दिली.

“जगाला सुसज्ज असे मनुष्यबळ प्रदान करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळेच शाळांमध्ये आता काळजीपूर्वक व्यावसायिक शिक्षणाची निवड करण्यात आली आहे. भविष्यात जगाला व्यावसायिक उपक्रमाने सुसज्ज अशा मनुष्यबळाची गरज भासणार असून त्यादृष्टीनेच शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण देण्यात येणार आहे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असेही केसरकर यांनी सांगितले.

ते म्हणाले की, “जगाला फक्त डॉक्टर, अभियंते किंवा शास्त्रज्ञांची गरज भासणार नाही. प्लंबर, इलेक्ट्रिशियन आणि सुतारकाम करणाऱ्या कामगारांचीही तितकीच गरज भासणार आहे. राज्य सरकार लवकरच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि अन्य संस्थांशी भागीदारी करणार असून लवकरच शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित उपक्रम राबवण्यात येणार आहेत.”

हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सहसंस्थापक निरंजन हिरानंदानी या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लहान वयातच मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या संकल्पनेचे निरंजन हिरानंदानी यांनी कौतुक केले. प्रत्यक व्यवसायाचे आपापल्या क्षेत्रात महत्त्व विषद करताना हिरानंदानी म्हणाले की, “२० वर्षांपूर्वी मला ५० प्लंबरची आवश्यकता होती, त्यावेळी माझ्या कार्यालयाबाहेर २५० प्लंबरची रांग लागली होती. आता मला ५० प्लंबरची गरज असेल तर शोधूनही जेमतेम ५ प्लंबर सापडतील. त्यामुळेच शालेय स्तरावर अशाप्रकारचे व्यावसायिक शिक्षण देणे गरजेचे आहे.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in